नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 ची अंमलबजावणी सुरू आहे. यात गाव हगणदारीमुक्त झाल्यानंतर गावात शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्या आनुषंगिक इतर कामे करून गाव स्वच्छतेच्या बाबतीत शाश्वत ठेवणे म्हणजे गाव हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करणे होय. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टप्प्याटप्प्याने २०२४ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्रथम टप्प्यात पुरुषोत्तमनगर, ता.शहादा, बोकळझर, लहान कडवान, वाटवी ता.नवापूर, आडची, कोठली खुर्द, ता. नंदुरबार या सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीत शासनाने ठरवून दिलेले शौचालयाचा नियमित वापर व शाळा व अंगणवाडी व सरकारी कार्यालयात शौचालय उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती हे निकष पूर्ण होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी सहाही ग्रामपंचाती हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.
हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित झालेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतींचा ओडीएफ प्लस दर्जा कायम ठेवून गावात शाश्वत स्वच्छता ठेवावी, तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी आपले गाव ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती या निकषाप्रमाणे पूर्वतयारी करून शासनाच्या या उपक्रमात सरपंच, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी केले आहे.