नंदुरबार : राज्य शासनाच्या निर्देशनुसार मंगळवारपासून नवीन नियमावलीनुसार बाजारपेठ सुरू करण्यात आली. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बाजारातील विविध व्यवसाय सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली होती. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सर्व व्यवसाय सुरळीत सुरू होते.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात १५ जूनपर्यंत नियमांचे पालन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, परवानगी देण्यात आलेले व्यवसाय मंगळवारपासून सुरू झाल्याने बाजारपेठेत एकच गर्दी झाली होती. शहरातील सोनार गल्ली, मंगळबाजार, स्टेशन रोडवरील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीची दुकाने सुरू झाली होती. दरम्यान, शहरातील विविध भागात तयार कपडे तसेच कापड खरेदी-विक्रीची दुकानेही सुरू झाल्याने त्या ठिकाणी सकाळी आठ वाजेपासून गर्दी झाली होती. कोविड नियमांचे पालन करून त्यांच्याकडून व्यवसाय सुरू करण्यात आले होते.
सोबतच वैद्यकीय सेवा, औषधे, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दूध विक्रेता व वृत्तपत्र छपाई व वितरण, कृषी अवजारे व कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे विक्रीची दुकाने तसेच इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती व ट्रॅक्टर दुरुस्तीची दुकाने, बाजार समितीसह किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाईची दुकाने, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी विक्री यांची दुकाने आणि पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने ही जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने सुरळीत सुरू करण्यात आली होती.
तब्बल दोन महिन्याच्या काळानंतर सिंधी कॉलनी शास्त्री मार्केट येथील दुकाने सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी सकाळी आनंद व्यक्त केला. लग्नसराई असल्याने तयार कपड्यांसह कापड विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दी झाल्याचे दिसून आले.
दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या सराफ बाजारात पहिल्या दिवशी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याची माहिती देण्यात आली. तयार दागिने तसेच शुद्ध सोने खरेदी करण्यावर अनेकांकडून भर देण्यात येत होता. लाॅकडाऊननंतरही सोने खरेदी-विक्रीत तेजी कायम असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बॅरिकेड्स मात्र जैसे थे
राज्य शासनाकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे दोन महिन्यांपासून शहरातील नेहरू चाैक, कोरीट रोड, तळोदा रोड, अंधारे चाैक, धुळे चाैफुली या ठिकाणी एका बाजूने लावलेले बॅरिकेड्स मात्र कायम दिसून आले. हे बॅरिकेड्स काढले नसल्याने गर्दीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली होती.
एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी
नवापूर आगारातून काही बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्यानंतर मंगळवारी नंदुरबार आगारातून बसफेऱ्या सुरू होतील अशी शक्यता होती. परंतु येथून केवळ अत्यावश्यक सेवा आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठीच बसेस सोडण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख मनोज खैरनार यांनी दिली.