लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तिळासर गावाच्या फाट्याजवळ ट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.पोलीस सूत्रांनुसार, धुळे येथील शत्रुघ्न तावडे यांच्यासह परिवारातील सात जण सुरत येथे नातेवाईकांकडे उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. उत्तरकार्य आटोपून सुरत येथून कारने (क्रमांक एम एच १५ डी एस ८८४४) धुळ्याकडे जात होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावर तिळासर गावाच्या फाट्याजवळ हॉटेल माधव समोर धुळे कडून सुरत कडे जाणारा ट्रकने (क्रमांक सी.जी.०४ जे.सी.१५२५) भरधाव वेगाने सुरत कडुन येणाऱ्या कारला जोरात धडक देऊन अपघात केला.या अपघातात सुशिलाबाई भाईदास तावडे (६०), वैभव संजय कांदिलकर (२०), विजय भरत तावडे (सात), भूषण विलास बागुल (४८), दर्शना भरत तावडे (११), शत्रुघ्न रोहिदास तावडे (४८), सुमनबाई रोहिदास तावडे (६०) हे जखमी झाले असून यांच्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी डॉ. अजय वर डॉ. सचिन भदाने परिचारिका प्रसन्ना वळवी, निर्मला राऊत यांनी उपचार केले. सर्व जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झालेला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ट्रक चालक अपघातानंतर वाहन घटनास्थळी सोडून पसार झालेला आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात वैभव संजय कांदिळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अरुण कोकणी अतुल पाटील हे करीत आहेत.
ट्रक व कार अपघातात सातजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:12 IST