व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३०९ कंत्राटी निदेशक व गटनिदेशक केवळ १४ हजाराच्या वेतनावर काम करत आहेत. गत ११ वर्षांत त्यांना वर्षात कोणतीही वेतनवाढ देण्यात आलेलली नाही. या कर्मचा-यांना तात्काळ कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी राज्य शासकीय आयटीआय कंत्राटी निदेशक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा ठिकाणच्या आयटीआयमध्ये ही समस्या असून, याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सदस्य महेंद्र काळे व जितेंद्र माळी यांनी दिली. शासकीय सेेवेत समावेश होईल, या एका उद्देशाने राज्यातील ३१५ कर्मचारी काम करत आहेत. परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याेग्य तो निर्णय न झाल्यास १ जुलै नंतर सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेण्याचा इशारा समितीने शासनाने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात कंत्राटी निदेशक/ गटनिदेशक यांना तात्काळ नियमित सेवेत सामावून घेण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आयटीआय कर्मचारी संघटनेचा संघर्ष समितीकडून आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST