शाळा भरली, पण नियोजनाची पाटी फुटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:50 PM2020-11-26T12:50:26+5:302020-11-26T12:50:34+5:30

मनोज शेलार नंदुरबार वार्तापत्र शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठिवण्यासाठी मानसिक तयारी करून घेण्यात प्रशासन, शाळा आणि शिक्षण ...

The school was full, but the plan was broken! | शाळा भरली, पण नियोजनाची पाटी फुटली!

शाळा भरली, पण नियोजनाची पाटी फुटली!

Next

मनोज शेलार

नंदुरबार वार्तापत्र

शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठिवण्यासाठी मानसिक तयारी करून घेण्यात प्रशासन, शाळा आणि शिक्षण विभाग कमी पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. पहिल्या तीन दिवसात केवळ पाच ते १२ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. यापुढे किती राहतील याची शाश्वती नाही. शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाईन क्लास बंद झाले. एकीकडे ऑनलाईन बंद, दुसरीकडे शाळेत जाण्याची परवड यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती आहे. शाळा सुरू करतांना नियोजनाचा अभाव राहिला हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत असल्यामुळे २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. शाळा सुरू करण्यासाठीच्या सर्व मार्गदर्शक सुचना शाळांना देण्यात आल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात शाळा सुरू झाल्याच्या दुुसऱ्या दिवसापर्यंत ७४ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली होती. अर्थात २५ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झालेले नव्हती. सुदैवाने त्यातील केवळ ०.७ टक्केच अर्थात एक टक्का पेक्षाही कमी शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आढळले. शिक्षकेतर कर्मचारी देखील एक टक्केच्या आतच पॅाझिटिव्ह आढळले. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील समाधानाची बाब आहे. सद्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू करण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठविण्यास धजावत नाहीत. दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थीपेक्षा पालकांचे मोठे टेन्शन वाढिवणारे असते. जास्तीत जास्त गुणांनी पाल्य उत्तीर्ण व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक पालकाची असते. त्यातच जर पाल्याला कोरोनाची लागण झाली तर त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते ही भिती पालकांमध्ये आहे. त्यामुळे देखील शाळेत पाठिवण्याबाबत पालक राजी होत नसल्याची स्थिती आहे. शिवाय अनेक शाळांनी हमीपत्र भरून घेतांना सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील हे वदवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेही पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 
ग्रामिण भागातून येणारे विद्यार्थी सार्वजनीक प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतील. तेंव्हा त्यांच्या सुरक्षेचे काय?,  मुुलींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस नाहीत. ग्रामिण भागात एस.टी.च्या बसफेऱ्या नाहीत. शाळेच्या वेळेवर वाहन मिळणारच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी शाळेत येणार कसे? हा प्रश्न आहे. या सर्व बाबींचे नियोजन करणे आवश्यक होते, ते झाले नाही. कोरोनाविषयी काय उपाययोजना केल्या आहेत, घाबरून जाण्याचे कारण नाही, आम्ही आहोत ना? हा विश्वास पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात प्रशासनासह सर्वच यंत्रणा अपयशी ठरल्या.  
या सर्व बाबींमुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचाच जास्त संभव आहे. आधीच पहिले सत्र अर्थात अर्धे शैक्षणिक वर्ष वायाच गेले आहे. त्यात ही गोंधळाची स्थिती राहिली तर ‘आडात ना पोहऱ्यात’ अशी स्थिती होऊ शकते. याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. 
शेजारच्या धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात सर्व नियोजन करून, पालकांमध्ये विश्वास निर्माण करून आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही ते झाले असते तर शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली असती असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

Web Title: The school was full, but the plan was broken!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.