सातपुड्डयाचे पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:11 PM2020-10-31T12:11:20+5:302020-10-31T12:11:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ...

Satpuddya's target is to grind five lakh tonnes of sugarcane | सातपुड्डयाचे पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सातपुड्डयाचे पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा साखर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे कसे जास्त प्रमाणात जमा होतील हा विचार केला आहे. यंदाच्या हंगामात दोन हजार ३६५ रुपये प्रती मेट्रीक टन ऊसाला भाव देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाच्या ८.३३ टक्के दिवाळीचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केली. दरम्यान, यंदा कारखान्याने साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. 
सातपुडा साखर कारखान्याच्या ४६ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून चेअरमन दीपक पाटील व जि.प.च्या आरोग्य तथा शिक्षण सभापती जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संगणीकृत वजन काट्याचे पूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजाराम पाटील, तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र रावल, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी दीपक पाटील म्हणाले की, खान्देशात गाळप हंगाम सुरू करण्याचा  पहिला बहुमान तसेच उसाचा दर जाहीर करणारा सातपुडा साखर कारखाना एकमेव आहे. आपल्या कारखान्याने दर जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील इतर कारखाने दर जाहीर करतात. कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी स्व.पी.के. अण्णांनी निर्माण केलेल्या संस्था ह्या कुठल्याच परिस्थितीत विकल्या जाणार नाहीत. काही विरोधक आपल्या संस्थांबाबत अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत. अशांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सभासदांच्या मालकीच्या या संस्था सभासदांच्या हितासाठी आहेत. उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  सुरू असून यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य लाभत     आहे. यंदाच्या गळीत हंगामात सभासदांनी सातपुडा कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार राजेश पाडवी म्हणाले की, गेल्या आठ महिन्यापासून कोरोना विषाणू संक्रमण, अतिवृष्टी, दुष्काळ, ओला दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून भविष्यात शेतकऱ्यांचा गट तयार करून शेती उपयोगी यंत्र व शासकीय योजनांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी त्याचप्रमाणे विमा कंपन्यांशी संपर्क साधून प्रयत्न करणार आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी नदीवरील बंधारे पूर्ण करणार असून केंद्र शासनाच्या मदतीने शहादा  व तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागातील नदी-नाल्याून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्याचे नियोजन असून याकरिता १०० कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. सिंचनाला माझे विशेष प्राधान्य      असून पिकांच्या संरक्षणासाठी        कृषी विभाग, आमदार निधी व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शेतात ड्रोनच्या माध्यमाने कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. विजय चौधरी म्हणाले की, स्व.पी.के. अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची उभारणी केली. यामुळे परिसराचा कायापालट झाला भविष्यातही         या सर्व संस्था दिमाखदारपणे  वाटचाल करतील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे     आहे. 
प्रास्ताविकात कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी यंदाच्या गाळप हंगामात साडेपाच लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट असून त्यादृष्टीने ऊस तोडीचे व वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

Web Title: Satpuddya's target is to grind five lakh tonnes of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.