रोकडमल हनुमानाची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:09 PM2020-11-22T12:09:20+5:302020-11-22T12:09:38+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील उंटावद येथे रोकडमल हनुमानाचे जागृत मंदिर  असून दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. ...

Rokadmal Hanuman's Yatra canceled | रोकडमल हनुमानाची यात्रा रद्द

रोकडमल हनुमानाची यात्रा रद्द

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  तालुक्यातील उंटावद येथे रोकडमल हनुमानाचे जागृत मंदिर  असून दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. सालाबादप्रमाणे यावर्षीही वैकुंठ चतुर्दशी २८ व २९ नोव्हेंबर रोजी भरणारी यात्रा कोरोनाचे संभाव्य संकट पाहता खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्याबाबतचा मासिक सभेत ठराव पारित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने सरपंच सुरेश गोपाळ पाटील व ग्रामविकास अधिकारी महेश चौधरी यांनी दिली. 
शहादा तालुक्यात प्रख्यात  असलेले रोकडमल हनुमान मंदिर  गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावद येथे असून वैकुंठ चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी उंटावद-होळ  ग्रामपंचायत सोयी-सुविधेसाठी तत्पर  असते. सुमारे २०० वर्षांपूर्वी गोमाई नदीच्या पुरात वाहून आलेल्या हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील जागृत देवस्थान म्हणून उंटावद येथील मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत देवस्थान असल्याने दर शनिवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. नवसाला पावणारा हनुमान म्हणून येथील देवस्थानाची प्रसिद्धी असून येथे साखर, केळीची तुला करून रोडग्याचा प्रसाद वाटप केला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार  करून मुख्य मूर्ती जागेवरून न हलविता मंदिराचा विस्तार करण्यात आला आहे. मंदिराची उंची सुमारे ५१ फूट असून दोन हजार चौरस फुटाचे भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे संभाव्य संकट टाळण्यासाठी हा यात्रोत्सव रद्द  करण्यात आला असून परिसरातील जनतेने व व्यापारी वर्गाने याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सरपंच सुरेश गोपाळ पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश चौधरी, सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.

Web Title: Rokadmal Hanuman's Yatra canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.