लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे जूनपर्यंत सुरू असलेला कापूस खरेदीचा हंगाम येत्या दिवाळीनंतर सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांना तयारी करण्याचे आदेश पणन महासंघाने दिले होते. आदेशानुसार नंदुरबार बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर दोन हजार शेतकऱ्यांच्या नोंदण्या आताच पूर्ण झाल्या आहेत. यंदा सततच्या पावसामुळे कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात जागतिक बाजारपेठेत भारताकडून होणारी कापूस निर्यात बंद आहे. तसेच केंद्राकडून हमीभावही जाहिर झालेला नाही. परिणामी शेतकरी कापूस विक्री करत आहेत. यात प्रामुख्याने खेडा खरेदीला ऊत आला असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात दिसून आले आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नोंदण्या करण्याचे आदेश बाजार समित्यांना पणन महासंघाकडून देण्यात आले होते. यातून पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार १७ शेतकऱ्यांनी कापूस नोंदणी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नोंदण्या खरेदी संदर्भात नसून केवळ माहितीसाठी पणन महासंघ शेतकऱ्यांच्या क्षेत्र आणि कापूस उत्पादनाचे संकलन करत आहेत. परंतु ह्या नोंदण्यात ह्या कापूस खरेदी संदर्भातच असल्याचा दावा शेतकरी करत आहेत. यातून दर दिवशी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे तालुक्याच्या विविध भागात गुजरातमधील व्यापारी खेडा खरेदीसाठी दाखल होत आहेत. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याकडे संबधित यंत्रणेने लक्ष घालण्याची मागणी आहे. यंदाही दिवाळीनंतर कापूस खरेदी होणार असल्याने शेतकरी संकटात आहेत. दिवाळीपूर्वी कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नंदुरबार बाजार समितीकडे दोन हजार कापूस उत्पादकांनी केल्या नोंदण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:21 IST