सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील गेंदा येथील जबऱ्या रजन पावरा व कालीबाई जबऱ्या पावरा हे पती-पत्नी एक मुलगा व तीन मुलींसह गुजरातमधील सौराष्ट्रातील जामपुरा (पोरबंदर) येथे मजुरीसाठी गेले होते. कोरोनामुळे अनेक ठिकाणी व्यवसाय बंद झाल्याने काम गेल्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात गुजरात व महाराष्ट्र राज्यात एस.टी. बस, तसेच खाजगी लक्झरी बस बंद झाल्याने महाराष्ट्रातून मजुरीसाठी गेलेले स्थलांतरित मजूर अडकले होते. जिल्हा बंदीमुळे गुजरात व महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू होती. रोजगार गेल्याने आता गावाकडे कसे परतायचे असा प्रश्न पावरा कुटुंबाला पडला. त्यामुळे त्यांनी अहमदाबाद येथून एक सायकल खरेदी केली. त्यात आवश्यक घरगुती सामान ठेवण्यासाठी कॅरी जोडली आणि कुटुंबीयांना सायकलवर बसवीत प्रवासाला सुरुवात केली. अनेक अडथळ्यांवर संघर्ष करीत पावरा कुटुंब गावी सुखरूप पोहोचले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे अनेक मजूर व कामगारांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभर मजुरी करायची आणि मिळालेल्या पैशातून दोन वेळची भाकरी मिळवायची असे असते. मात्र, लॉकडाऊन लागल्यामुळे सर्व बंद असल्याने अशा मजुरांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी अनेक सेवाभावी संघटना व दानशूर यांच्या मदतीने गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली होती.
पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यात मजुरीसाठी जातो. कोरोनामुळे रोजगार बंद आहे. आम्ही आमच्या गावाकडे परतलो आहोत. सायकलीवर सर्व आवश्यक साहित्य सोबत घेतले आहे. रस्त्यामध्ये थांबून स्वयंपाक तयार करून जेवण झाल्यावर काहीवेळ आराम केल्यानंतर पुन्हा मार्गाला लागतो.
-जबऱ्या पावरा, मजूर, गेंदा, ता. धडगाव.