दिवसेंदिवस आधार नोंदणी प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असला तरीही नंदुरबार जिल्ह्यात मात्र समस्यांचा ससेमिरा सुटलेला नाही. सर्वच ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ असले तरीही अपडेशन करण्यास नेट कनेक्टीव्हिटीमुळे वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी एकच जण सर्व कामे करत असल्याचे चित्र आहे. सपाटीच्या चार तालुक्यात आधार दुरुस्ती ही तातडीने होत असली तरी दुर्गम भागातील मोलगी, धडगाव तसेच इतर मोठ्या गावांमधील केंद्रांमध्ये मात्र नेट कनेक्टीव्हिटी नसल्याने समस्या वाढत आहेत. यातून दुरुस्त्या करुनही त्या अपलोड होत नसल्याने इच्छित वेळेत नवीन आधार कार्ड मिळत नाही. यामुळे बँका, पोस्ट विभाग यांच्याकडून सुरु करण्यात आलेली आधार दुरुस्ती केंद्रे ही दुर्गम भागात सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
विविध कामांसाठी आधार अपडेशन
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी तसेच विविध योजनांच्या लाभार्थींना आधार अपडेशन गरजेचे आहे. यात प्रामुख्याने पत्ता नूतनीकरण, विवाहानंतर नाव बदल, लहान मुलांचे आधार अपडेशन यासह विविध कारणांनी आधार अपडेट करण्याची कार्यवाही होते. आधार दुरुस्ती केल्यानंतर काही ठिकाणी तर काही ठिकाणी मात्र उशिराने कामकाज होत असल्याचे दिसून आले आहे. दुर्गम भागात आधार दुरुस्तीसाठी नागरीक पायपीट करत धडगाव किंवा अक्कलकुवा येथपर्यंत येत असल्याने त्याठिका सेंटर्स वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
आधार केंद्रांवर येण्यासाठी सातत्याने फिरफिर करावी लागते. अनेक वेळा नेट कनेक्टीव्हिटी नसल्याने परत जावे लागते. धडगावात केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
-करण पावरा, धडगाव
महाविद्यालयीन कामांसाठी आधार दुरुस्ती करणे आवश्यक आहे. धडगाव, मोलगी किंवा अक्कलकुवा येथे आधार अपडेशन न झाल्यास मग, थेट तळोदा किंवा नंदुरबार येथे जावे लागते.
-दारासिंग पावरा, धडगाव,