लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : हजारो वर्षांची परंपरा असलेली राणी दिवालीचा उत्सव गव्हाणीपाडा ता.तळोदा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आदिम संस्कृती जपण्यासाठी व पुढच्या पिढीत देखील आपल्या संस्कृतीचे बीज पेरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.गावात सुख-समृद्धी नांदावी यासाठी गावकऱ्यानी निसर्ग देवतेला साकडे घातले जात आहे.आदिवासी बांधवांचे सण हे आदिवासी संस्कृतीप्रमाणे वेगळे असून मानवाला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत. पूर्वीप्रमाणे आदिवासी आता विखुरलेल्या स्थितीत राहिले नाही. त्यांनी आता आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहेत. विविध स्तरावर नायकाची भूमिका बजावत आहेत. परंतु आजच्या आधुनिक युगात देखील आपली हजारो वर्षांची परंपरा, रूढी, संस्कृती जपून त्यानुसार अजूनही सण, उत्सव साजरे केले जात आहे.राणी दिवाळी हा अशाच एका उत्सवाचा भाग आहे. हा उत्सव खोपडी एकादशीपासून संक्रांतीपर्यंतच्या काळात आयोजित केला जात असतो. मौखिक मान्यतेनुसार धातुयुगाच्या पूर्वीपासून गाव दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीचा जन्म दाब राजमंडल म्हणजेच दाब या गावी झाला. गांडा ठाकूर या राजाची बायको असलेली दिवाळी ही पोरोब देवाची मुलगी असून आईचे नाव आठा डुंगर असे होते. राणी दिवालीबाबत अशी मान्यता आहे की, आदिवासी समाज हा पूर्वी जंगलात राहून उपजीविका करीत असे त्यांना वाघ, सिह, अस्वल या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असे हे राणी दिवाळीला समजले असावे असा अंदाज काही पूर्वजांचा आहे. तेव्हापासून या पशूंना आनंदी ठेण्यासाठी राणी दिवाळीने हातात कुवार झाडू घेऊन ताटात एक सोन्याचा दिवा, बाली, पायात घुंगरू बांधून नाचू लागली. तेव्हापासून या आदिवासी बांधवाना जंगली जनावरांचा त्रास कमी होऊ लागला तेव्हापासून ते आतापर्यंत राणी दिवाळीचे अनुकरण आदिवासी समाजबांधव करीत आहे. यंदा झालेल्या गाव दिवाळीत पुजारी जयवंत पाडवी (खुशगव्हाण) सह गावातील हिरसिंग पाडवी, जयसिंग पाडवी, सुनील पाडवी, काशीराम पाडवी, देविसिंग पाडवी, मगन पाडवी, गिरीधर पाडवी, जालमसिंग पाडवी आदी उपस्थित होते.
गव्हाणीपाड्यात राणी दिवाली उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:54 IST