लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ८ जुलैपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले होते. या काळात नियमांचे उल्लंघन करीत विनाकारण दुचाकीवर डबलसीट हिंडणारे तसेच मास्क न लावणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. चार दिवसात पोलिसांनी ७० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.शहादा शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. प्रशासनाच्या खंबीर धोरणामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी लॉकडाऊन काळात महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडायला बंदी आहे. तसेच मुख्य बाजार परिसरात येताना नागरिकांनी दुचाकी आणू नये, असे पोलीस प्रशासनातर्फे अनेकदा बजावूनही नागरिक विनाकारण दुचाकी आणून नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. लॉकडाऊन काळात शहरात विनाकारण हिंडणाऱ्यांची गर्दी वाढू लागली होती. त्यातच दुचाकींवर डबल, ट्रीपल सीट बसवून शहरभर हिंडणारे नियम धाब्यावर बसवत होते. अशांवर पोलिसांनी कारवाई करत ७० मोटारसायकलधारकांवर कारवाई केली आहे. त्यात प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईने विनाकारण हिंडणाºयांवर अंकुश बसला तर डबलसीट दुचाकी चालविणाºयांना जागेवर शिक्षा देत विनाकारण न फिरण्याचे आश्वासन घेवून सोडण्यात आले. तर अनेकांना दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विक्रांत कचरे, भगवान कोळी, वाहतूक विभागाचे दादाभाई साबळे, अजय पवार, विकास चौधरी, मनिंदर नाईक आदींनी केली.
शहाद्यात ७० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:55 IST