निवेदनात म्हटले आहे की, तळोदा पालिकेच्या नवीन वसाहतीत रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, विजेचे खांब, लाईट व ओपन स्पेस सुशोभीकरण आदी सुविधा उपलब्ध नसून दरवर्षी पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ते नसतात. आम्ही नियमित कर भरतो तसेच पालिकेत घर बांधकाम करणेपोटी लाखो रुपये भरूनही आम्हाला आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने आमच्यावर अन्याय होत आहे. पालिकेच्या माध्यमातून उत्तर भागातील नवीन वसाहतीत चिनोदा रस्त्याच्या उजवीकडे व शहादा रस्त्याच्या डावीकडे असणाऱ्या वसाहतीत रस्ते दोनवेळा तयार झाले आहेत तर दामोदर नगर, गणेश नगर, राजकुळे नगर, पिठाई नगर, भगवान नगर, काशीनाथ नगर, रविहंस नगर, राजहंस नगर, तापी माँ नगर, जगन्नाथ जोशी नगर, भगवान सीताराम नगर, शंकर नगर, सीताई नगर, पूनाबाबा नगर आदी भागात रस्ते, गटारी नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच गटारी नसल्याने शोषखड्डे भरून दुर्गंधीयुक्त वास येतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत यापूर्वीही निवेदन देऊन अवगत करूनदेखील या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. पालिका प्रशासनाचे नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य असतानाही दुर्लक्ष होत आहे. विविध विकास कामे सुरू असताना मात्र मागील २० वर्षापासून या भागात नागरी सुविधांचा अभाव असून याबाबत अनेकदा आश्वासन देऊनही कामांची सुरुवात झाली नाही. आमची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. रहिवासी भागात चिखल व पाणी साचते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर खडी व मुरुम टाकून तात्पुरती सोय करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर चेतन चव्हाण, पी.एम. वानखेडे, रघुवीरसिंह कुवर, लक्ष्मीकांत शेंडे, विश्वनाथ गायकवाड, जगन्नाथ पाटील, बी.एस. पाटील, जितू कुंभार, योगेश चव्हाण, मोरे, पाटील, मुकुंद वाघ, राजपूत, पाठक, संदीप साळी आदींसह १७४ नागरिकांच्या सह्या आहेत.