गेल्या चार दिवसात जयनगरसह परिसरातील गावांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी खरीप लागवड तसेच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत नाहीये. मात्र ज्या शेतकऱ्यांनी खरीप पूर्व कापसाची लागवड केली आहे, अशा पिकांना या रोहिणी नक्षत्रातील पावसाचा चांगला फायदा होणार आहे.
जे शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी तसेच लागवड करणार आहेत. असे शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. तर जे शेतकरी मूग, भुईमूग, तूर, उडीद यासारख्या पिकांची पेरणी करणार आहेत. ते शेतकरी पेरणीचे साहित्य निटनेटके तसेच व्यवस्थित करताना दिसून येत आहेत. जे शेतकरी मागील २५ वर्षांपासून शेती करत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार रोहिणी नक्षत्रात लागवड तसेच पेरणी केल्यास दुबार पेरणी तसेच लागवडीचे संकट ओढवू शकते. असा अंदाज जाणकार शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहिणी नक्षत्राच्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागत केलेल्या जमिनीत पावसामुळे चांगला गारवा निर्माण झाला आहे. शेतकरी सध्या मृग नक्षत्राच्या पावसातच पेरणी व लागवड करणार आहेत.