नंदुरबार : समस्त आदिवासी पावरा समाज मंडळातर्फे देवमोगरा माता मंदिर सभागृहात विद्यार्थी गुणगौरव कोरोना योद्धांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देवमोगरा मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पावरा-बारेला समाजाचे अध्यक्ष नामदेव पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेलसिंग पावरा, सुरेश मोरे, अर्जुन पटले, इंजि. रवींद्र आर्य, गौतम खर्डे, सुनील सुळे, मणिलाल नावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार अर्जुन पटले यांनी केले. या कार्यक्रमात खडकी पॉईंटवर झालेल्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंडळातर्फे २०२०-२१ या वर्षात घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले. तसेच मंडळातील डॉक्टर, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचाही कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ.रणजित पावरा, डॉ.भरत पावरा यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील अनुभव कथन केले. दरम्यान, आमदार राजेश पाडवी, इंजि. रवींद्र आर्य, जेलसिंग पावरा, मणिलाल नावडे यांनीही मनाेगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.