सातपुड्याच्या डोंगराळ भागातील व तळोदा तालुक्यातील खांबला ते अक्राणी या सात किलोमीटर रस्त्याची गेल्या दीड वर्षापासून दुरवस्था झाली आहे. या मार्गावर आवश्यक त्याठिकणी संरक्षक भिंत व कठडे नसल्याने रस्त्याचा भाग खचून गेला आहे. दरम्यान, खचलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हा भाग अधिकच धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले आहे. या भागातील नागरिकांना धडगाव-शहादा व तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी दैनंदिन व शासकीय कामकाजासाठी जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असून, या मार्गाच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या मार्गावर त्वरित ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
खांबला ते अक्राणी रस्त्याच्या खचलेल्या भागामुळे व संरक्षक कठड्यांअभावी पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावर आवश्यक त्याठिकाणी संरक्षक भिंत व कठडे उभारून खचलेला भाग तात्काळ भरून वाहनधारकांसाठी सोयीचे करावे, अशी अपेक्षा आहे.
- राकेश पटले, बेडवाई, विहिरीमाळ, सामाजिक कार्यकर्ता