शहादा - कोविडची लाट कमी झाल्यानंतर शासनाच्यावतीने अनलॉक करण्यात आले असून, आता एसटी बसेस रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रवाशांचे पायदेखील बसस्थानकाकडे वळू लागल्याने बस स्थानकावर काही प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. शहादा आगारातून लांब पल्ल्याच्या शहादा ते मुंबई व शहादा ते पुणे या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दोन्ही गाड्यांना प्रवाशांची वाट बघावी लागत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी तर शहादा-मुंबई बस आगारातून सुटली तेव्हा बसमध्ये चार प्रवासी बसले होते. दोन्ही गाड्या रिकाम्या धावत असून, अजूनही प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद या गाड्यांना मिळत नसून, शहादा ते धुळे व शहादा ते नाशिक या गाड्यांना प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.
शहादा आगाराच्यावतीने पुणे व मुंबईसाठी रातराणी बस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केली आहे. मात्र, या बसेसना अजूनही अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. बसच्या तुलनेत शहादा शहरातून रोज पुण्यासाठी सहा व मुंबईसाठी तीन खाजगी ट्रॅव्हल्स पूर्ण क्षमतेने भरून धावत असल्याचे चित्र आहे. बसच्या तुलनेत प्रवासी ट्रॅव्हल्सला पसंती देताना दिसून येत आहेत.
सर्वाधिक गर्दी धुळे व नाशिकसाठी
शहादा आगारातून धुळे व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने धुळे व नाशिक बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसून येत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अजूनही प्रवासी लांबचा प्रवास टाळत असल्याचे चित्र आहे. अनलॉक नंतरही बसस्थानकामध्ये पाहिजे तशी प्रवाशांची गर्दी दिसून येत नाही.
केवळ १९ बसेसच आगारात
कोरोनामुळे दीड वर्ष एसटीची चाके ठप्प झाली होती. परंतु त्यानंतर शासनाने काही निर्बंध शिथिल केल्यामुळे काही बसेस सुरु झाल्या. सध्या अनलॉक मध्ये बहुतांश बसेस रस्त्यावर धावत आहेत. दिवसभरात ६५ फेऱ्यातून २३ हजार किलोमीटर बसेस धावत आहेत. शहादा आगारातील ११० पैकी ९१ बसेस रस्त्यावर धावत असून केवळ १९ बसेसच आगारात आहेत. बाकी उरलेल्या बसेसही लवकरच रस्त्यावर धावतील असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शहादा आगारातील एकूण बसेस ११०
सध्या सुरू असलेल्या बसेस ९१
कोरोना गेल्यामुळे मास्क वापरत नाही.
शहादा शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे आता मास्क वापरायची गरज वाटत नाही. जास्त गर्दीत गेलो तर मास्क लावतो. मात्र, आता पहिल्यासारखी भीती राहिली नाही.
मोहित ठाकरे, प्रवासी
केवळ गर्दीतच मास्क वापरतो
एकट्यात असलो तर मास्कची गरज भासत नाही. मात्र गर्दीत गेल्यावर व आजूबाजूला खूप गर्दी असली की मास्क वापरतो. आता बसच्या बाहेर उभे असल्याने मास्क काढला आहे. मात्र बसमध्ये गर्दी झाल्यास मास्क लावेल.
अनिल सोनवणे - प्रवाशी
हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे
कोविडच्या अनलॉक नंतर एसटी बसची वाहतूक सुरळीत होत आहे. प्रवाशांचा प्रतिसादही वाढत आहे. उत्पन्नात देखील भर होत आहे. मात्र, आता सर्व सुरळीत झाल्यानंतर देखील पाहिजे तो प्रतिसाद लांब पल्ल्याच्या गाड्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. कोविडची खबरदारी म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन होऊन गाड्यांना सॅनिटाझर देखील करण्यात येत आहे. म्हणून प्रवाशांनी कोणतीही भीती बाळगू नये. - योगेश लिंगायत, आगारप्रमुख शहादा