पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:36 PM2020-04-02T12:36:00+5:302020-04-02T12:36:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड ...

Order for distribution of nutritious food | पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या विविध शाळांमध्ये पडून असलेला दाळ- तांदूळाचा साठा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत़
देशात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे़ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिकेद्वारे विविध शाळांमध्ये पडून असलेले धान्य आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे़ यानुसार शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ व डाळी हे साहित्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या सर्व शाळांमध्येही मार्च व एप्रिल महिन्याचे शालेय पोषण आहार योजनेचे दाळ व तांदूळ हे साहित्य पडून आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शाळेत शिल्लक असलेल्या तांदूळ व विविध डाळींचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत मुख्याध्यापक, शाळेतील शालेय पोषण आहार योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने समन्वयाने कार्यवाही करावी, साहित्य वाटप करण्यापूर्वी या योजनेला आपल्या गावात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी, साहित्य वाटप करताना गर्दी करू नये, ग्रामस्थांना रांगेत उभे करून त्यांच्यामध्ये एक मीटर अंतर ठेवण्यात यावे, एखादा विद्यार्थी व त्यांचे पालक आजारी असतील तर त्यांना हे साहित्य घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व शासनाने कलम १४४ अन्वये दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.
मुख्याध्यापक व शिक्षकांनी साहित्य वाटप केल्यानंतर त्याच्या नोंदी करावयाच्या आहेत. मुख्याध्यापकाने साहित्य वाटप केल्याचा अहवाल शिक्षणाधिकारी यांना द्यायचा आहे़ गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्याचा एकत्र अहवाल जिल्हा स्तरावर सादर करायचा आहे़ साहित्य वाटपाची कारवाई करण्यापूर्वी तालुक्याचे तहसीलदार व पोलिस अधिकारी यांना जिल्ह्याकडून आलेल्या पत्राची प्रत देण्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू आहे, अशा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत गर्दी न करता कलम १४४ चे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कळवले आहे़

जिल्ह्यातील खाजगी व शासकीय शाळांमध्ये मार्च एप्रिल महिन्याच्या शालेय पोषण आहार योजनेसाठी धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आलेला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातच पालकांना रोजगारही नसल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Order for distribution of nutritious food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.