लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्राथमिक शिक्षक पदवीधर पदे पदोन्नतीने भरण्यासाठी सुधारित पदवीधर सेवाजेष्ठता यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या भाषा व समाजशास्त्र विषयाची पदवीधर सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. सदर यादीत फक्त बी.ए.बी.एड.शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर म्हणून समावेश करण्यात आलेला होता. यास अखिल नंदुरबार जिल्हा संघाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. जे प्राथमिक शिक्षक दहावी, बारावीच्या डी.एड.नंतर नोकरीस लागलेले होते त्यांनी सेवेत असतांना पदवी परीक्षा पास करून घेतलेली असेल अशा शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षक समजून त्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत समावेश करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश शासनाच्या आदेशात दिले आहेत. ही बाब संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम साहेब व उपशिक्षणाधिकारी बी.एन.रोकडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने संघटनेने घेतलेल्या हरकतीच्या व अनेक शिक्षकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण विभागाने सुधारित सेवा जेष्ठता यादी प्रकाशित केलेली आहे. या यादीत शिक्षक पदवीधर झालेले आहेत. परंतु बी.एड. नाहीत अशांचाही सेवाजेष्ठतेने समावेश केलेला आहे. त्यामुळे सामान्य शिक्षकांना ही शासन निर्णयाप्रमाणे न्याय मिळाला आहे. शिक्षक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष मोहन बिस्नारिया, अशोक देसले, रविंद्र बैसाणे यांनी ही माहिती दिली.
शिक्षकांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:26 IST