लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर पालकांकडून मिशन अॅडमिशन सुरु झाले आह़े यासाठी सर्वप्रथम दाखल्यांचे नियोजन केले गेले असून 1 ते 18 जून या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून तब्बल 36 हजार 600 दाखल्यांचे वितरण पूर्ण झाले आह़े यात सर्वाधिक दाखले हे उत्पन्नाचे आहेत़ कधीकाळी तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारुन दाखले तयार करण्याची पहिली पायरी सुरु व्हायची, तलाठी ते तहसीलदार कार्यालय असा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिनाभराने हाती आलेला दाखला घेत पालक मुलांच्या शैक्षणिक प्रवेशप्रक्रियांना सुरुवात करत होत़े गेल्या 10 वर्षात यात आमुलाग्र बदल होऊन आता दाखल केवळ एका क्लिकवर काही तासात पालकांच्या हाती येत आहेत़ थोडय़ा उशिरानेच नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावलेल्या ऑनलाईन कामकाजाने यंदा चांगला जोर पकडला असून पालक आणि विद्यार्थी यांच्यात यामुळे समाधान व्यक्त होत आह़े शासनाच्या महाऑनलाईन या संकेतस्थळावर नंदुरबार जिल्ह्यातून 1 जून पासून विविध दाखले आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांनी 55 हजार अर्ज दाखल केले होत़े या अर्जावर झालेल्या तातडीच्या कामकाजामुळे 36 हजार जणांना दाखले वितरीत करण्यात आले आहेत़ यात उत्पन्न दाखले, अधिवास (डोमेसाईल), राष्ट्रीयत्त्व (नॅशनलिटी) 10 टक्के आरक्षणातून जातीचा दाखला, शेतकरी असल्याचा, नॉन क्रिमीलेयर, रहिवासी, 33 टक्के महिला आरक्षणाच्या जागेसाठी हे दाखले तयार केले गेले आहेत़ गेल्या आठवडय़ात शासनाचे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे दाखले तयार करण्यास अडचणी येत होत्या़ सोमवारी दुपारनंतर संकेतस्थळ सुरु होऊन सुरळीत झाल़े
जिल्ह्यात सेतू केंद्रांऐवजी महा-ई- सेवा केंद्रांना नागरिकांकडून प्राधान्य दिले जात़े एकूण 290 केंद्रांमधून हे 36 हजार दाखले वाटप करण्यात आले आहेत़ यात उत्पन्नाचे 25 हजार 175, अधिवास आणि राष्ट्रीयत्त्व प्रमाणपत्रे 2 हजार 605, जातीचे 2 हजार 200, नॉन क्रिमीलेयर 832, रहिवासी दाखले 65, प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे शासननिर्धारित मुंद्रांकांचे 9 हजार अॅफेडेव्हिट, 38 शेतकरी असल्याचे दाखले, 10 टक्के जाती आरक्षणासाठीचे 68, महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आणि डोंगरी भागातील रहिवासी असल्याचे प्रत्येकी 7 असे एकूण 36 हजार दाखल वाटप केले गेले आहेत़ संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने हे काम करण्यात आल्याची माहिती आह़े