लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : विसरवाडी-नंदुरबार मार्गावर बोदवड गावाच्या शिवारात ॲपेरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पोलीस सूत्रानुसार, विसरवाडी-नंदुरबार मार्गावर गुरुवारी साडेपाच वाजेच्या सुमारास हिरालाल गोरजी वळवी (३५) व शिवदास आकल्या गावीत (५४) (दोन्ही रा.भरडू, ता.नवापूर) हे डिझेल भरण्यासाठी ॲपेरिक्षा (क्रमांक जीजे ०७ वायवाय-२५०६) विसरवाडी येथे घेऊन येत होते. या वेळी बोदवड गावाच्या फाट्याजवळ वळण रस्त्यावर रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात हिरालाल वळवी यांच्या अंगावर रिक्षा पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्यासोबत असलेल्या शिवदास गावीत हे किरकोळ जखमी झाले. जखमी अवस्थेत दोघांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी हिरालाल वळवी यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. याबाबत आकल्या गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून मोटार अपघाताची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास हवालदार अरुण कोकणी हे करीत आहेत.दरम्यान, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲपेरिक्षा अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:34 IST