नवापूरकर पाण्याबाबत यंदा चिंतामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:35 PM2020-05-28T12:35:47+5:302020-05-28T12:35:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : एकीकडे उन्हाची तिव्रता व लॉकडाऊन असूनही पालिकेचे नियोजन यशस्वी झाल्याने यंदा नवापुरातील पाणीपुरवठा गंभीर ...

No worries about Navapurkar water this year | नवापूरकर पाण्याबाबत यंदा चिंतामुक्त

नवापूरकर पाण्याबाबत यंदा चिंतामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : एकीकडे उन्हाची तिव्रता व लॉकडाऊन असूनही पालिकेचे नियोजन यशस्वी झाल्याने यंदा नवापुरातील पाणीपुरवठा गंभीर न होता सुरळीत राहीला. नागरी तक्रारी यंदा झाल्या नाहीत हे विशेष.
शहरासाठी जीवनदायीनी असलेल्या रंगावली नदीच्या पाण्यावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबुन आहे. जीवनदायीनी रंगावली नदी १९८५ पर्यंत बारमाही होती. नंतरच्या काळात नदी कोरडी पडण्यास सुरूवात झाली व शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हळुहळु गंभीर होत गेला. रंगावली धरणातील सोडण्यात येणारे पाणी शहरापावेतो पोहोचत नाही तेव्हा नदीपात्र कोरडे पडून परिणामी शहरात पाणी संकट ओढवते.
शहरात दररोज दोन वेळेस पाणी पुरवठा करण्याची पालिकेची परंपरा आहे. पालिकेच्या पाणी संकलन केंद्राला समांतर व मरीमाता मंदीराजवळ केटीवेअरच्या झालेल्या उभारणीमुळे नदीपात्रात पाणी साचते. त्यासह नदीपात्रातच सहा इंच व्यासाची विंधन विहीर असुन त्याद्वारे पाण्याचे संकलन व वितरण होत आले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता एकीकडे वाढत जावून तपमान ४० च्या पार गेले आहे. गत वर्षी रखरखत्या उन्हात याच काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे व विशेषत: महिलांचे हाल झाले होते. शहरातील सर्वच परिसरातील महिलांनी पालिकेत धडक देऊन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले होते. शहरातील सेवाभावी नागरीक व पालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा करूनही नागरीकांची ओरड कमी झाली नव्हती. गत वर्षी पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू असताना पालिकेत पाण्याच्या बाबतीत तक्रार घेऊन यावे लागत असल्याची महिलांची नाराजी उफाळून आली होती. एकूणच शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. गत वर्षी शहरातील प्रत्येक प्रभागात तत्कालीन आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून बोअरवेल करण्यात येऊन हातपंप बसविण्यात आले.
शहरात ग्रामपंचायतीच्या काळापासून पाणीपुरवठा योजना व त्याच्या वितरीका कार्यान्वित आहेत. नव्या वसाहतींमध्ये नव्याने वितरीका टाकण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी सात लाख, चार लाख व प्रत्येकी दोन लाख लीटर क्षमतेचे दोन असे एकूण चार जलकुंभ आहेत. लालबारी व लहान चिंचपाडा येथे प्रत्येकी दोन लाख लीटर क्षमतेचे दोन जलकुंभ निमार्णाधीन आहेत. दैनंदीन ५० लाख लीटर पाणी शुध्द करणारे जलशुध्दीकरण केंद्र अलिकडे कार्यान्वित करण्यात आले असून, सध्य:स्थितीत त्याचा वापर सुरू असल्याने शुध्द जल मिळत आहे. पालिकेने सिंचन विभागाकडून पाणी घेण्याची परवानगी घेतली असून दुसऱ्या टप्प्यातील पाणी आजच धरणातुन सोडण्यात आले आहे. हे पाणी रविवार पावेतो केटीवेअरमध्ये येवून त्याची साठवणूक झाल्यास १५ जुन पावेतो पाण्याचा साठा शहरासाठी उपलब्ध होणार आहे. यंदा पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही ओरड झाली नाही. पावसाळा लांबल्यास नदीपात्रातील सहा इंच व्यासाच्या विंधन विहीरीतुन पाण्याचे संकलन व वितरण करण्याची तयारी पालिकेने करून ठेवली आहे.

नवापूर पालिका व नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून एप्रिल २०१८ मध्ये रंगावली नदीपात्रात केटीवेअर जवळील गाळ काढण्यात आल्याने पाण्याच्या संचयाची क्षमता वाढीस आल्याचा लाभ शहराला होत आहे.

उद्यासाठी हवे असणारे पाण्यासाठी आजच प्रयत्न व तजवीज होणे गरजेचे आहे हे ओळखुन ५४ कोटी रूपये खर्चाची योजना शासनाकडे सादर करण्यात आली आहे. रंगावली धरणातून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शहरापर्यंत पाणी आणणे व इतर आवश्यक कामांचा त्यात समावेश आहे. लॉकडाऊनचे काळे ढग निवळल्यावर या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करू.
-हेमलता पाटील, नगराध्यक्षा, नवापूर पालिका.

शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण़्यासाठी ठोस उपाय योजना केल्या जातील. नागरिकांनी पाण्याचे महत्व जाणून त्याचा वापर काटकसरीने करा. पावसाचे प्रमाण कमी होत आहे, ही बाब चिंताजनक असून नागरीकांचे सहकार्य मिळाल्यास यंदा टंचाई जाणवणारच नाही, असे प्रयत्न आहेत.
-रेणुका गावीत, सभापती, पाणीपुरवठा, नवापूर पालिका.

Web Title: No worries about Navapurkar water this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.