आरोग्य केंद्रांना१६ रूग्णवाहिकांसाठी नव्याने प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:30 PM2020-06-06T12:30:27+5:302020-06-06T12:30:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १६ अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्सचा प्रस्ताव, आरोग्य व ...

New proposals for 16 ambulances to health centers | आरोग्य केंद्रांना१६ रूग्णवाहिकांसाठी नव्याने प्रस्ताव

आरोग्य केंद्रांना१६ रूग्णवाहिकांसाठी नव्याने प्रस्ताव

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १६ अत्याधुनिक अ‍ॅम्बुलन्सचा प्रस्ताव, आरोग्य व आदिवासी विकास विभागाकडे पाठविला आहे. यात धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील नवसंजीवनी योजनेंतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्राचाही समावेश असल्यामुळे या दुर्गम भागात अ‍ॅम्बुलन्सची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी तत्काळ प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन त्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा-तळोदा, धडगाव, अक्कलकुवा व नवापूर या सहा तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी साधारण ५९ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांतर्गतच आरोग्य उपकेंद्रेदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील बहुतेक आरोग्य केंद्रांना स्वत:ची रूग्णवाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांमधून गंभीर रूग्णाला जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येत असते. राकसवाडे, कोपर्ली, भालेर, डोगेगाव, प्रतापपूर, पुरूषोत्तमनगर, राणीपूर, वाल्हेरी, झापी, बिलगाव, राजबर्डी, डाब, जांगठी, खापर, वाण्याविहीर, अशा १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नवीन अत्याधुनिक रूग्णवाहिकांचा प्रस्ताव आरोग्य संचालक व आदिवासी विकास विभागाकडे पाठविला आहे. तथापि संबंधीत यंत्रणांनी त्यावर अजूनही प्रशासकीय मंजुरीसाठी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा प्रस्ताव तसाच प्रलंबित पडला आहे.
वास्तविक आरोग्य केंद्रांना ज्या गाड्या पुरविल्या आहेत. त्या कालमर्यादीत म्हणजे जुन्या झाल्या आहेत. तरीही संबंधीत आरोग्य केंद्रातील प्रशासन त्यांना दुरूस्ती करून जशातश्या चालवित आहेत. तरीही संबंधीतांना सातत्याने तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असतो. याशिवाय नंदुरबार, शहादा, नवापूर या तालुक्यांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्येही मोठ्या संख्येने गावांचा समावेश आहे. साहजिकच एका रूग्णवाहिकेवर काम भागत नसल्याचेही सांगितले जाते अशा वेळी जिल्हा अथवा उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना पुढील उपचारासाठी पोहोचविणे मोठे जिकरीचे ठरत असते. काही वेळेस १०८ ची मदत घ्यावी लागते. परंतु वेळेवर उपलब्ध होत नाही. कारण ही सेवा स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविली जाते. त्यामुळे संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकास संस्थेच्या मुख्यालयास आधी फोन करावा लागतो. त्यानंतर तेथे रजिस्टरमध्ये रूग्णांची नोंद केली जाते. त्यानंतर ते स्पॉट विचारतात. त्यातही कधी तिच्यावर चालक नसतो तर कधी डॉक्टर नसतो. एवढे करूनही कधी-कधी उपलब्ध होत नाही. याचा अनुभव खुद् पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांनादेखील पाच महिन्यांपूर्वी आला होता. गाडीचा चालक नसल्यामुळे त्यांना तब्बल दोन तास ताटकळत राहावे लागले होत, अशी १०८ च्या सेवेबद्दल वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने रूग्णवाहिकांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे.


जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य व इतर सुविधा प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. यासाठी राज्यशासनाने नवसंजीवनी योजना या भागात सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासनाने अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्यांचा समावेश केला आहे. या तिन्ही तालुक्यातील प्रतापपूर, वाल्हेरी, झापी, बिलगाव, राजबर्डी, डाब, जांगठी, खापर, वाण्याविहीर आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक रूग्णवाहिकांचा प्रस्ताव प्रस्तावित केला आहे. येथे आधीच आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. शिवाय केंद्रातील बहुसंख्य गावे अतिदुर्गम भागातील आहे. कधी-कधी रूग्णवाहिका मिळाली नाही तर नातेवाईकांना आपल्या गंभीर रूग्णास केंद्र अथवा उपकेंद्रापर्यंत आणताना बांबूलन्सची मदत द्यावी लागत असते. शासनाने त्यांच्यासाठी नवसंजीवनी योजना सुरू केली असली तरी त्या योजनेतील आरोग्य केंद्रांनाच रूग्णवाहिकांची अडचणी आहेत. दरम्यान तळोदा येथे नुकत्याच झालेल्या नवसंजीवनीच्या बैठकीत रूग्णवाहिकांचा विषयही गाजला होता. त्यामुळे आरोग्य व आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


 

Web Title: New proposals for 16 ambulances to health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.