लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूरनजीक सहा जणांनी चारचाकी वाहन अडवून त्यातील दोन कोटी 40 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सहा जणांनी कारमधील दोघांवर रिव्हॉल्वर रोखून ही लूट केली आहे. जळगावहून अहमदाबाकडे ही रक्कम नेली जात होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.पिंपळनेर-नवापूर रस्त्यावर नवापूरपासून पाच किलोमिटर अंतरावर ही घटना घडली. गुरुवारी जळगाव येथून हरेशभाई पटेल व महुलभाई पटेल व मेहुलभाई पटेल हे सफारी गाडीने (एमएच 19 बीयू 9009) दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये घेवून अहमदाबादकडे जात होते. मध्यरात्री नवापूरपासून पाच किलोमिटर अंतरावर पटेल यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून आलेल्या इनोव्हा कारने (जीजे 05 सीएल 2243) अडविले. वाहनातील सहा जणांनी सफारी कारमधील दोघांवर रिव्हॉल्वर रोखून त्यांना बाहेर काढले. तिघांनी त्यांना धरून ठेवत इतरांनी कारमधील दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघांना तेथेच सोडून लुटारू पसार झाले. पटेल द्वयींनी नवापूर गाठून तेथून अहमदाबाद येथे मुळ मालकाला आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे किशोर नवल, नवापूरचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाकाबंदी करूनही उपयोग झाला नाही. याबाबत शैलेशकुमार पटेल, रा. सुरत यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत करीत आहे.
नवापूरनजीक अडीच लाखांचा दरोडा, रिव्हॉल्वर लावून दोघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:32 IST