नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशन ही संकल्पना बंद करून रुग्णांची रवानगी रुग्णालयात होत आहे. दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची माहितीही घेतली जात असून, जिल्ह्यात एका रुग्णामागे २० जणांचा शोध घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शहर व तालुक्यासाठी चार मोबाइल टीम तयार करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून काँटॅक्ट ट्रेसिंग राबविण्यात येते किंवा कसे, याची माहिती घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला असता, सर्वच ठिकाणी काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने रुग्ण आढळून आल्यास, त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. प्रत्येक रुग्णाची भेट घेणारे, त्यांच्या संपर्कात आलेल्या, कार्यालय, कुटुंबातील सदस्य यांची माहिती घेत, त्यांना स्वॅब घेण्यासाठी बोलावले जात आहे. स्वॅब देण्यासाठी कोणी येऊ न शकल्यास, त्यांचे स्वॅब घेण्यासाठी मोबाइल टीममधील आरोग्य कर्मचारी जात असल्याचे यावेळी दिसून आले. या पथकांना नागरिकही सहकार्य करत आहेत.
नंदुरबारात ट्रेसिंग
नंदुरबार शहरात मंगळवारी दुपारी १० रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. शहरातील विविध भागांत या रुग्णांना संपर्क करण्यात आले. यात देसाईपुरा, लक्ष्मीनगर या भागात दाट वस्ती असल्याने, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने चाैकशी सुरू झाली. कुटुंबीयांचे स्वॅब घेतले गेले, तसेच इतरांची तपासणी झाली.
केस क्रमांक दोन
दहिंदुले आणि बालआमराई या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण समोर आले. या दोघांच्या संपर्कात नेमके किती लोक आले किंवा कसे, याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. प्रत्येकी एक पथक या दोन्ही गावांमध्ये रवाना करून संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात आली.
आरोग्य कर्मचारी तैनात
जिल्हा कारागृहातील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची माहिती समोर आल्यानंतर, संबंधिताच्या संपर्कात आलेले, तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी यांची चाैकशी करत आरोग्य पथक येथे रवाना करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काँटॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. एका रुग्णामागे किमान २० जणांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेत, त्यांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.
-डाॅ. एन.डी.बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार