लॉकडाऊनमध्येही अवैध दारूचा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:15 PM2020-04-07T12:15:30+5:302020-04-07T12:15:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी व लॉकडाऊच्या काळात देखील जिल्ह्यात अवैध दारूचा पूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. ...

Lockdown also floods illicit liquor | लॉकडाऊनमध्येही अवैध दारूचा पूर

लॉकडाऊनमध्येही अवैध दारूचा पूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी व लॉकडाऊच्या काळात देखील जिल्ह्यात अवैध दारूचा पूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसात राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी शहादा, नवापूर, नंदुरबार तालुक्यातून ५ लाखापेक्षा अधीकचा दारूसाठा जप्त केला आहे. शहरी भागात तर काही दारू विक्रेते घरपोच सेवा बजावत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मात्र शासनाचा दारू दुकाने, बिअरबार, बिअरशॉपी बंद ठेवण्याच्या उद्देशाला हारताळ फासला जात आहे.
राज्य शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याच दिवसापासून सर्व दारू दुकाने, बिअरबार, बिअरशॉपी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची चांगलीच गैरसोय झाली आहे. अशा तळीरामांची सोय करण्यासाठी अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यात झालेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. आता पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा दारू विक्रेत्यांवर वक्रदृष्टी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
साठा रेकॉर्ड तपासणार
लायसन्स असलेले सर्व देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने, बिअरबार व बिअरशॉपी यांचाकडे असलेला साठा यापूर्वी अर्थात दारू दुकाने बंद करण्याच्या आदेशावेळी मोजण्यात आला आहे. जेंव्हा ही दारू दुकाने व बिअरबार सुरू होतील त्यावेळी हा साठा राज्य उत्पादन शुल्क विभाग पुन्हा तपासणी करणार आहे. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई थेट लायसन्स रद्द होणे किंवा आर्थिक दंड या स्वरूपात राहणार आहे.
अवैध दारू विक्री प्रकरणी नंदुरबार येथील हॉटेल छोटीवर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलमधील बंद करतांनाचा दारूसाठा व कारवाई झाली त्यादिवसाचा दारू साठा याची पडताळणी केली असता तफावत आढळल्याने या हॉटेलचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
घरपोच सेवाही उपलब्ध
शहरी भागात काही दारू विक्रेते घरपोच सेवा उपलब्ध करून देत आहेत. संबधितांकडे मागणी केल्यावर एक ते दिड तासात संबधीत व्यक्ती घरपोच सेवा उपलब्ध करून देतात. ही दारू संबधितांना कुठून उपलब्ध होते हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात बोगस दारू बनविण्याचे कारखाने असल्याचे वेळोवेळच्या कारवाईने उघड झाले आहे. शिवाय मध्यप्रदेश सिमेलगत देखील असे कारखाने आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश बनावटीची बोगस दारूचा सध्या नंदुरबारात सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबारात घरपोच दारू पोहचिविणाऱ्या महाभागांचाही पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांनाही जेरबंद करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.


दुचाकीस्वारकडेही अवैध दारू
नंदुरबार : दुचाकीवर अवैध दारू घेवून जाणाऱ्या एकास तालुका पोलिसांनी अटक केली.
हरिश्चंद्र पितांबर पाटील, रा.रजाळे, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. शनीमांडळ फाट्यावजळ पाटील हे दुचाकीने जात होते. त्यावेळी त्यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अडविले असता त्यांच्याकडे सहा हजार रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. त्याला लागलीच अटक करण्यात आली.
याबाबत हवालदार गणेश सोलंकी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नवापुरात एक लाख सहा हजारांची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत एलसीबीने एक लाख सहा हजार रुपयांची अवैध दारू व एक वाहन असा एकुण तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एलसीबीला मिळालेल्या माहितीवरून ४ एप्रिल रोजी नवापूर येथील जुना आरटीओ नाका येथे पथकाने रात्री सापळा लावला होता. पहाटे साडेपाच वाजता नवापूरकडून महामार्गावरून गुजरात राज्यात पांढऱ्या रंगाची टोयोटो कार (क्रमांक जीजे ०६-सीएम ६०३) येतांना दिसली. यावेळी पथकाने वाहन थांबविण्याचा इशारा करूनही ते भरधाव निघाले. त्यानंतर त्याचा पाठलाग करून अडविले असता चालक साहुल बालू गावीत, रा.नवापूर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यात ८२ हजार ३६३ रुपये किंमतीची देशी दारू मिळून आली. ही दारू नवापूर येथून गुजरातमधील खेड्यापाड्यात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे चालक गावीत याने सांगितले. पथकाने साहुल गावीत याला ताब्यात घेतले. तसेच वाहन व दारूसाठा असा एकुण दोन लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी घटना नवापूर शहरातील हॉटेल जितेंद्रनजीक घडली. हॉटेलच्या आडोशाला विनोद भगवानदास गोकलाणी, रा.नवापूर हा देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने त्या ठिकाण धाड टाकली असता त्याच्याकडे २४ हजार २५४ रुपये किंमतीचा दारूसाठा आढळला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार महेंद्र नगराळे, मुकेश तावडे, दादाभाऊ वाघ, सुनील पाडवी, शांतीलाल पाटील, युवराज चव्हाण, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांनी केली.

Web Title: Lockdown also floods illicit liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.