लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेल्या पश्चिमेकडील मैदानी भागात शेतकऱ्यांसाठी अन्न व पशुधनासाठी चारा म्हणून उपलब्ध होणाऱ्या भात पिकांची काढणी हंगाम सुरू झाला आहे. यंदा भाताची उशिरा लागवड झाल्याने उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.परिसरात बहुतेक शेतकऱ्यांकडून पारंपरिक व चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून लागवड केलेल्या भात पिकाची कापणी, झोडपणी, मळणी आणि साठवणुकीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. भात पिकांपासून पशुधनासाठी चाराही उपलब्ध होत असल्याने तो साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यंदा जुलैचा पंधरवाडा उलटूनदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात लावणी खोळंबली होती. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना भात लागवड केली. त्यामुळे यंदा भात पिकांच्या उत्पादनात घट होणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बहुतेक शेतकऱ्यांनी भात वाणात हळवा, निगरवा, गरवा, सुवासिक तसेच संकरित वाणाची लागवड केली आहे. यात जया, फुले समृद्धी, मसुरी, बासमती-३७०, इंद्रायणी, खुशबू, सह्याद्री तसेच गुजरात राज्यात उपलब्ध असलेल्या वाणाचेही उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. मागील काही वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नगदी पिकांची लागवड केल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे परिणामी दैनंदिन प्रती व्यक्तीला लागणारे अन्नधान्य कमी पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यानच्या कालावधीत शेजारील गुजरात राज्यात शेतीकामासह विविध रोजगारार्थ हंगामी स्थलांतराचे प्रमाण वाढले. कालांतराने येथील शेतमजूर भात पीक हंगामाची लावणी ते कापणीपर्यंतची कामे करण्यासाठीच लोकांचे तेथे स्थलांतर सुरू झाले. त्यामुळे तेथील पीक पद्धती आत्मसात करून येथे आल्यावर प्रायोगिक तत्वावर थोड्याफार प्रमाणात भात पिकाची लागवड सुरू केली. परिणामी येथील हवामानात भरघोस पीक येवू लागल्याने परिसरात दिवसेंदिवस भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होत गेली. त्यातच तालुका कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीूचा बदलता कल लक्षात घेवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शेतकरी गटाच्या माध्यमाने चांगल्या प्रतीच्या वाणाची लागवड केल्याने उत्पादनात भरघोस वाढ झाली. यंदा मात्र भाताची उशिरा लागवड झाल्याने उत्पादनात घट येणार असल्याचे भात उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
सोमावल परिसरातील बहुतेक मजूर गुजरात राज्यात भात लावणी ते काढणीपर्यंतच्या कामासाठी जातात. या शेतमजुरांनी तेथील भात पीक घेण्याची पद्धत आत्मसात केल्याने या परिसरात भाताचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला. मात्र यंदा पावसाच्या लहरीपणामुळे म्हणजेच जुलैचा पंधरवडा उलटूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतरच्या कालखंडात झालेल्या सततच्या अतिपावसामुळे पिकास पाहिजे तेवढे पोषक वातावरण न मिळाल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची अपेक्षा नसली तरी उत्पादन खर्च निघावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.