लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोळदा ते सेंधवा रस्ता रुंदीकरणादरम्यान कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यापर्यंत काम अपूर्ण असल्याने येथे रस्त्यावरच डबके साचून तलावाचे स्वरूप आल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन मंगळवारपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात अपूर्ण काम असलेल्या ठिकाणी व पर्यायी रस्त्यांवर चिखल होत असल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होतात. समशेरपूर कारखाना ते प्रकाशा गावापर्यंतचा मार्गही खडतर झाला आहे. तापी नदीवरील पुलावरही खड्डे पडले आहेत. पर्यायी रस्ते हे मातीचे असल्याने खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरुप आल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागतात. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची रस्ते विकास मंडळाचे कार्यकारी अभियंता एन.के. बोरसे यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला तंबी दिली व मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यास सांगितले. दोन जेसीबी मशीन लावून त्याठिकाणी कामाला सुरुवात केली आहे. पाऊस असल्याने डांबर टाकता येत नाही. म्हणून मुरूम टाकून खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.
कोरीट फाटा ते समशेरपूर कारखाना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:19 IST