जळगाव : मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील प्रमुख नेते एकनाथराव खडसे यांना मुख्यमंत्री करावे यासंबंधी खान्देशातील आमदारांनी तयारी केली. पक्षाकडे मागणी करण्यापर्यंत हे आमदार सरसावले होते. पण पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील, असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी स्वत:हून हे लॉबिंग रोखले.
खान्देशातील काही आमदारांसह ३५ आमदारांनी मुंबईतच खडसे यांची भेट घेतली. त्यात भाजपाच्या ओबीसी विचारधारेच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. भाजपा राज्यात ओबीसी विचारधारेमुळे वाढला. गोपीनाथ मुंडेंनंतर आता ओबीसी चेहरा पुढे केला जावा, असे मुद्दे समोर आल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली.
-------------------
मी मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही आणि लॉबिंगची पद्धत तर भाजपात नाहीच. परंतु खान्देशात भाजपाला जोरदार यश मिळाले. लोकसभाच काय तर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या. म्हणूनच आता मुख्यमंत्रीपद खान्देशला मिळावे, अशी मागणी लोकांमध्येच आहे.
-एकनाथराव खडसे, आमदार आणि ज्येष्ठ नेते, भाजपा
-------------------
शिवसेना हा २५ वर्षे भाजपाचा मित्र पक्ष होता. एवढे वर्ष सोबत राहिलेला पक्ष आता सत्तास्थापनेत सोबत यावा. पहिले प्राधान्य शिवसेनेलाच द्यावे, नंतर इतरांचा विचार करावा, असे स्पष्ट मत खडसे यांनी मांडले. खान्देशातील आमदार खडसेंसोबत मुंबईत होते. जे आमदार मुंबईत भेटू शकले नव्हते ते बुधवारी खडसेंना त्यांच्या जळगावातील मुक्ताई या निवासस्थानी येऊन भेटले. त्यात उदेसिंग पाडवी (शहादा), हरिभाऊ जावळे (रावेर), सुरेश भोळे (जळगाव), उन्मेष पाटील (चाळीसगाव) यांचा समावेश होता. संजय सावकारे (भुसावळ), गिरीश महाजन (जामनेर) यांनी मंगळवारी रात्रीच खडसे यांची भेट घेतली. तसेच धुळ्य़ाचे आमदार अनिल गोटे यांनी खडसे यांच्याशी मुख्यमंत्रीपदासंबंधीच्या मुद्दय़ांवर मोबाइलवर बुधवारी चर्चा केली. खान्देशातील आमदारांनी खडसेंना मुख्यमंत्री करावे यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मागणी करण्याचा प्रस्ताव आणला, पण त्याला खडसे यांनीच नकार दिल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली. कोकण, मुंबई, मराठवाडा व इतर विभागांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. खान्देशच वंचित राहिला आहे. आता खान्देशला संधी मिळावी, अशी अपेक्षा आमदारांनी खडसेंकडे व्यक्त केली.