याआधी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी १०० टक्के हजेरी शाळांमध्ये दिसून येत नाही; कारण सुरुवातीला शाळा सुरू झाल्यावर पालकांमध्ये भीती होती. मात्र प्रत्यक्ष शाळा चालू झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले नाही. तरीही विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसून येत नाही. आताही राज्य शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याच्या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी प्रत्यक्षात किती मुले नियमित शाळेत हजेरी लावणार, हा प्रश्न कायम आहे. सगळीकडे कोरोनाचा आलेख खाली येत असताना शहादा तालुक्यात मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पालकांमध्ये जास्त धाकधूक निर्माण झाली आहे; कारण पाचवी ते आठवीची मुले लहान असल्याने पालकांमध्ये भीती कायम आहे.
मागील १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर याचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. म्हणून आता प्रत्यक्षात शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यास मदत होणार आहे. अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्यांची मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच होती. प्रत्यक्षात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यावर शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सगळ्यांना मास्क अनिवार्य तसेच सॅनिटायझरचा वापर यांसारख्या गोष्टी सगळ्या शाळांमध्ये अनिवार्य करायला पाहिजेत; तरच विद्यार्थी आणि शिक्षकही कोरोना संक्रमणापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करू शकतील.
मागील १० महिन्यांपासून शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते; कारण आमच्यासारख्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे आमची मुले ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होती; म्हणून आता शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होणार आहे.
- रवींद्र दंगल खलाणे, पालक, जयनगर, ता. शहादा.