मॉर्निंग वॉकमधून नागरिकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:21 PM2020-07-05T12:21:30+5:302020-07-05T12:21:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील विविध भागात पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून आमदार राजेश पाडवी यांनी ...

Interacted with citizens from the Morning Walk | मॉर्निंग वॉकमधून नागरिकांशी साधला संवाद

मॉर्निंग वॉकमधून नागरिकांशी साधला संवाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील विविध भागात पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून आमदार राजेश पाडवी यांनी त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेत विविध विषयांवर चर्चा केल्या. पहाटेच्या सुमारास प्रत्यक्ष आमदार आपल्याशी विविध विषयांवर संवाद साधत असल्याने नागरिक अवाक् झाले होते.
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक घरात होते. केंद्र शासनाने अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सवलती दिल्या आहेत. यात पहाटेच्या सुमारास मॉर्निंगवॉक, खुल्या जागेत व्यायाम करणे अशा गोष्टींंना परवानगी दिली आहे. यामुळे दररोज सकाळी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. आमदार राजेश पाडवी व स्विय सहायक हेमराज पवार यांनीही मेमन कॉलनीतील राहत्या घरापासून मॉर्निंग वॉकला सुरुवात केली. शहरातील सरस्वती कॉलनी, साईबाबानगर, गोविंदनगर, सप्तशृंगी माता मंदिर परिसर, मेन रोड आदी भागात मॉर्निंग वॉक करताना नागरिकांशी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली व त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
आमदारांशी संवाद साधताना नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या सांगितल्या. यात प्रामुख्याने नवीन वसाहतीतील रस्ते व गटारी तयार करणे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने त्यावर उपाययोजना करणे, परिसरात कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नाही, रात्रीच्यावेळी अनेक भागात पथदिवे बंद असतात, ग्रामीण रुग्णालयात योग्य औषधोपचार केला जात नाही अशा विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. यावर संबंधित विभागाशी चर्चा करून उपाययोजना करण्यासह समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे आमदार पाडवी यांंनी सांगितले. नवीन बसस्थानक परिसरात क्रिकेट खेळणाºया नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. महिन्यातून किमान दोन दिवस आमदारांनी असा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. आजारपणाची लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ शासकीय रुग्णालयाशी संपर्क करून आरोग्य तपासणी करून घ्यावी. सर्वांनी सामूहिकपणे जबाबदारी स्वीकारून व प्रशासनाला सहकार्य करुन कोरोना विषाणूला हद्दपार करण्याचे आवाहनही आमदार पाडवी यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले.

Web Title: Interacted with citizens from the Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.