लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : २२ मार्च ते ८ आॅगस्टपर्यंत येथे एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता. ९ आॅगस्ट रोजी पहिला रुग्ण प्रकाशा येथे आढळून आला. त्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन येथे कोरोना बाधित रुग्णांनी शंभरी पार केली असून आतापर्यंत १०२ रुग्ण आढळून आले आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाने कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी खूपच खबरदारी घेतली. गावात वेळोवेळी जनता कर्फ्यू पाळून उपाययोजना म्हणून वारंवार फवारणी केली. कोरोनापासून दूर राहण्यासाठी येथील तापी नदीपात्रात गणेशमूर्ती व दशामाता मूर्ती विसर्जनाला बंदी, तापी नदीघाटावर होणारे ऋषीपंचमी व इतर महोत्सव रद्द तसेच येथील केदारेश्वरसह इतर मंदिरे बंद करण्यात आली होती. प्रकाशा ग्रामपंचायत, महसूल व पोलिसांनी खबरदारी घेऊन उपाययोजना केलेल्या आहेत. विना मास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांना दंड देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामपंचायतीने व्यापारी व ग्रामस्थांना वेळोवेळी सूचना देऊन मास्क लावण्याचा सूचना केलेल्या आहेत. मास्क न लावल्यावर दंडात्मक कारवाईही झाली आहे. येथे रुग्ण संख्या वाढल्यानंतर ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या रुग्णवाहिकेद्वारे कोविड सेंटरला रुग्णांची ने-आण करण्यात येते. प्रकाशा गावातील एका गल्लीत कोरोना बाधितांची लक्षणे दिसल्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.बी. बावस्कर यांनी स्वॅब तपासणी शिबिर घेतले. त्यात ८८ जणांचे स्लॅब घेण्यात आले. त्यापैकी २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिबिरासाठी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी धर्मराज पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रकाशा पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.४६ रुग्णांवर उपचार सुरूप्रकाशा गावात ९ आॅगस्ट रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि मग त्यानंतर जणू धडाका सुरु झाला. दोनच महिन्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आणि आजच्या घडीला प्रकाशा येथे १०२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी दोन जणांचा मृत्यू तर ५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी दोन जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.
प्रकाशा येथे कोरोना रुग्णांची शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:44 IST