यापूर्वीही तहसील कार्यालयात तहसीलदार मंदार कुलकर्णी व पालिकेत मुख्यधिकारी महेश चौधरी यांना महिलांनी पाणीटंचाई संदर्भात निवेदन दिले होते. पालिकेने तात्पुरती उपाययोजना केली पण समस्या मात्र कायम राहिली. गेल्या पाच-सहा वर्षापासून जी.एम. लखानी परिसरातील महिलांना पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी थेट पालिकेत महिलांनी हंडा मोर्चा काढला. संतप्त महिलांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन टेबलावर हंडे ठेऊन पाण्याची समस्या मांडली.
नवापूर शहरातील लखानी पार्क परिसरात पाणीटंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत तीन स्मरणपत्र देण्यात आले. परंतु उपाययोजना झाली नाही. फक्त दोन दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा नियमित झाला. त्यानंतर पाणीपुरवठा कमी झाला. लखाणी पार्कमधील २० ते २५ घरांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. पाण्याची टाकी दुरुस्त करावी. अशा अनेक समस्या महिलांनी मांडल्या. यावर पाणीपुरवठा अभियंते सचिन अग्रवाल व कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार यांनी आठ दिवसात समस्या दूर केली जाईल, असे लेखी आश्वासन भाजप तालुकाध्यक्ष भरत गावीत व लाखणी पार्कमधील महिलांना दिले. त्यानंतर हंडा मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, एजाज शेख, परवेज लाखाणी, ए.के. सैयद, सुकेंद्र वळवी, अखतर बेलदार, अश्वमेघा वळवी, अदनान शेख, शबनम पठाण, आरिफ शेख, शाहीन शेख, शीतल महाले, छाया सोनी, साजदा शाह, शकीला शेख, शाहरूख आदी उपस्थित होते.
आधी दिलेल्या निवेदनानंतर नगरपालिकेने चार-पाच दिवस व्यवस्थित पाणीपुरवठा केला त्यात काही त्रुटी असल्यास दुरुस्ती केली जाईल. पुन्हा आठ दिवसात उपाययोजना करून वेळापत्रकानुसार चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा केला जाईल.
-अनिल सोनार, कार्यालय अधीक्षक, नवापूर पालिका