४० शेतकऱ्यांच्या गटाने घेतले ७५ हजार क्विंटल मिरचीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:56+5:302021-01-23T04:32:56+5:30

सातत्याने पिकांवर पडणारी रोगराई, नैसर्गिक आपत्ती यामुळे बेजार झालेल्या गुजरातमधील निझर तालुक्यातील पिंपलोद येथील योगेश पाटील या शेतकऱ्याने सन ...

A group of 40 farmers produced 75,000 quintals of chillies | ४० शेतकऱ्यांच्या गटाने घेतले ७५ हजार क्विंटल मिरचीचे उत्पादन

४० शेतकऱ्यांच्या गटाने घेतले ७५ हजार क्विंटल मिरचीचे उत्पादन

Next

सातत्याने पिकांवर पडणारी रोगराई, नैसर्गिक आपत्ती यामुळे बेजार झालेल्या गुजरातमधील निझर तालुक्यातील पिंपलोद येथील योगेश पाटील या शेतकऱ्याने सन २०१६ मध्ये बाहेरील राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व स्वअनुभवातून प्रतिकूल परिस्थितीतून मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले होते. त्यानंतर गावातीलच काही निवडक शेतकरी त्यांच्याशी जुळलेत व एकमेकांच्या मार्गदर्शनासह बाहेर राज्यातील तज्ज्ञांचे अनुभव यामुळे या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इतर पिके घेतली. साहजिकच नंदुरबार, शहादा व निझर तालुक्यातील पुन्हा काही शेतकरी त्यांच्यात सहभागी झालेत. पाहता पाहता साधारण ४० शेतकऱ्यांचा एक गट तयार झाला. सुरुवातीला हे शेतकरी एका गावात एकत्र आलेत. तेथे त्यांनी बैठक घेऊन वेगवेगळ्या पिकांबाबत एकमेकांचे अनुभव शेअर केले. सर्वांनीच पिकांवरील रोगराई, नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळी परिस्थितीत कसे मात करायचे, यावर आपापले विचार व्यक्त केले. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलात येणारे कोणत्याही पिकाचे वान, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, रासायनिक खते आणि कीटकनाशकांची योग्य फवारणी यावर विशेष जोर दिला. त्यानुसार पपई, टरबूज, टोमॅटो, कारली अशी पिके घेतलीत. यात शेतकऱ्यांना कमी खर्चात प्रचंड उत्पादन मिळू लागले. शिवाय उच्च दर्जाच्या मालामुळे भावदेखील चांगला मिळू लागला.

साहजिकच हे शेतकरी गेल्या तीन ते चार वर्षांपासून हंगामाच्या सुरुवातीस एका ठिकाणी एकत्र येतात. साधारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस एकत्र येतात. तेथे हंगाम व वातावरणासह पावसाबद्दल चर्चा करतात. त्यानंतरच कोणते पीक घ्यावे, यावर एकमत घेतात. यंदा या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिरची पिकावर जोर दिला होता. बाजार भाव आणि वातावरणानुसार मिरचीच्या वाणाची निश्चिती केली. साधारण ३०० एकर क्षेत्रावर या शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन, रासायनिक खतांची वेळोवेळी मात्रा शिवाय योग्य कीटकनाशकांची फवारणी त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या मिरचीच्या बागा फुलल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापासूनच शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यास सुरुवात केली आहे. आता पावेतो ७० हजार क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन झाल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. किलोमागे ३० रुपयांपासून तर ८० रुपयापर्यंत दर मिळाल्याचे शेतकरी सांगतात. एक एकरात सरासरी सहा ते नऊ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आल्याचे शेतकरी योगेश पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे पिपलोद गावातील फुलविलेल्या मिरचीचे पीक पाहण्यासाठी बाहेरून रोज शेतकरी गर्दी करीत आहेत. यावेळी येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.

शेतकरीच करतात स्वतः मार्केटिंग

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उच्च प्रतीच्या मालास बाहेरील राज्यात प्रचंड मागणी होत असते. त्यामुळे हे शेतकरी स्वतःच मार्केटिंग करीत असतात. ते मुबई, दिल्ली, अहमदाबाद या शहरांबरोबरच आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट करतात. व्यापारी व दलाल नसल्यामुळे साहजिकच मालाला दरदेखील चांगला मिळतो. यामुळे एकूण उत्पादनावर ७५ ते ८० टक्के नफा मिळतो. कर्जबाजारी झालेले हे शेतकरी आता कर्ज मुक्त झाले आहेत. शहाडा तालुक्यातील एका गावातील भाजी विक्रेता अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वबळावर नऊ एकर जमीन विकत घेतल्याचे सांगण्यात आले. हे शेतकरी नेहमी नवनवीन ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात. एवढेच नव्हे गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथील काही शेतकऱ्यांची यशोगाथा मिळवून प्रत्यक्ष तेथे भेट देऊन पाहणी करतात व तसा प्रयोग आपल्या शेतात राबवितात. त्यामुळे असे विक्रमी उत्पादन घेत असल्याचे शेतकरी सांगतात.

उत्पादनावर प्रचंड खर्च करूनही पाहिजे तसे उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला मिरची पिकावर वातावरणीय बदल, कीटकनाशक व खतांच्या मात्राचा नवीन प्रयोग केला. साहजिकच खूपच चांगले उत्पन्न आणि नफा मिळाला. त्यामुळे गावातील व बाहेरील शेतकरीही मार्गदर्शन घेऊ लागले आहेत. आता आम्हा ४० शेतकऱ्यांचा गट तयार झाला आहे. आम्ही नेहमी हंगामापूर्वी एकत्र येऊन एकमेकांचे मार्गदर्शन घेतो. त्यानुसार पिकाचे वाण वातावरणाप्रमाणे ठरवतो. त्यानंतर अधूनमधून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करतो. यामुळे पिकाची निगाही चागली राखली जाऊन पीक चांगले येते.

- योगेश पटेल, शेतकरी, पिपलोद

यंदा ३० एकरात मिरचीचे जीफोर सिग्नेत हे वाण लावले आहे. अतिवृष्टीतही आता पावेतो एकरी २५० क्विंटल माल निघाला आहे. गटातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व अनुभव यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. - अंकुश पटेल, शेतकरी, पिपलोद, ता. निझर

Web Title: A group of 40 farmers produced 75,000 quintals of chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.