आदिवासींचा दु:खाशी नाते जोडत राज्यपालांनी जिंकले आदिवासींचे मन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:03 PM2020-02-21T13:03:47+5:302020-02-21T13:03:54+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले ...

The Governor won the hearts of the tribals by connecting the tribal people with grief | आदिवासींचा दु:खाशी नाते जोडत राज्यपालांनी जिंकले आदिवासींचे मन

आदिवासींचा दु:खाशी नाते जोडत राज्यपालांनी जिंकले आदिवासींचे मन

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील आदिवासींचे दु:ख आणि वेदना ऐकुण भारावून न जाता थेट आपले दु:ख आदिवासींच्या दु:खात मिसळून त्यांच्याशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी समरस झाले. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच राज्यपालांनी आदिवासींची मने जिंकले आणि संवादाचा मार्ग मोकळा करीत आदिवासींच्या एकएक प्रश्नांचे हसतखेळत निराकरण केले.
सातपुड्याच्या दुर्गम भागात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री, बडे नेते व राज्यपालही येवून गेले. या नेत्यांनी आदिवासींचे दु:ख ऐकुण भारावले, सहानुभूतीचे बोल सांगितले, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या भुमिकेतून आदिवासींची मने जिंकली. त्यांनी आदिवासी दुर्गम भागातील धुळीने माखलेले रस्ते, वीज, आरोग्याचा प्रश्नांचा पाढा ऐकुण अजिबात सहानुभूती दर्शविली नाही. याउलट त्यांनी आदिवासींना आपल्या स्वत:च्या जिवानातून आणि वाणीतून जगण्याचे बळ भरले. ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री राहिलो, राज्यपाल झालो, खासदार झालो पण आजही माझ्या गावापर्यंत जाण्यासाठी मला काही अंतर पायीच जावे लागते. तुम्ही ज्या परिस्थितीत राहतात त्याहीपेक्षा माझ्या भागाची परिस्थिती गंभीर आहे. बालपणी मी देखील गरीबी भोगली आहे. अगदी हायस्कूलचे शिक्षण घेईपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती.... त्यामुळे परिस्थितीला घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जा, खूप मेहनत घ्या आणि यश साध्य करा असा मंत्र देत राज्यपालांनी आदिवासींच्या हृदयातच स्थान मिळविले. त्यामुळे आदिवासींनी राज्यपालांशी अतिशय मुक्तपणे खुल्या मनाने संवाद साधला. राज्यपाल कोश्यारी यांनी देखील तेवढ्याच सहजतेने आदिवासींचे प्रश्न ऐकुण अधूनमधून मिश्किलपणे कोपरखेळी घेत लोकांना सतत हसत ठेवले. ते म्हणाले, मी राज्यपाल झालो पण आजही सकाळचा चहा स्वत: बनवतो आणि भांडीही धुतो. येथे उपस्थित खासदार डॉ.हिना गावीत आणि मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी हे देखील स्वत: चहा करीत नसतील. त्यावर के.सी.पाडवी यांनी मी जेवन देखील बनवतो असे उत्तर देताच एकच हास्य फुलले.
मंत्री पाडवी यांच्या उत्तरावर तेवढ्या सहजतेने राज्यपालांनी मी तुमच्याकडे जेवायला येईल असे सांगून त्यांना समाधानी केले. प्रश्न मांडतांना काही महिलांनी रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी सहज गंमत करीत ‘अरे बाबा मेरा भी रोजगार की व्यवस्था करो, मै भी यहा आके रहेने वाला हू.... असे सांगताच पुन्हा हास्य फुलले.
अंगणवाडी केंद्रात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर बोलतांना त्यांनी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड या चौघांना एका रांगेत उभे करून आदिवासी पालकांना समजावून सांगितले, बघा येथील मंत्री, खासदार, जि.प.अध्यक्षा आणि जिल्हाधिकारी हे चारही जण आदिवासी आहेत. ते या पदापर्यंत पोहचू शकतात तर तुमची मुले का नाही.
तुम्ही देखील यांची प्रेरणा घ्या आणि मुलांना शिकवा असे थेट लोकांच्या मनाला भिडेल असे उदाहरण दिले. त्यामुळे उपस्थित अधिकच प्रभावीत झाले.
साधेपणाबाबत राज्यपालांनी स्वत:च्या जीवनशैलीचे उदाहरणे दिली. ते सांगतांनाच आज या भागात मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमच्यात राहणार तरच तुमचे प्रश्न समजेल. पण माझी राहण्याची व्यवस्था येथे एका शासकीय बंगल्यात केली आहे. तेथे खूप काही सुविधा करण्यात आल्या आहेत. पण मला त्यात रस नाही.
मला आपल्यातीलच एकाच्या घरी मुक्काम करायचा आहे. फक्त त्या घरात शौचालय असायला हवे एवढीच माझी अट असल्याचे सांगत उपस्थित आदिवासींशी नाते अजून घट्ट केले.

Web Title: The Governor won the hearts of the tribals by connecting the tribal people with grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.