नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील, आमदार राजेश पाडवी, उमविचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष राजेंद्र गावीत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, संचालक डॉ.सखाराम चौधरी, हिरालाल पाटील, नामदेव पटले आदी उपस्थित होते.
आमदार डॉ.तांबे म्हणाले की, समाजाचे चांगले करण्याची तळमळ अंगी असली तर निश्चितच समाजाची प्रगती करता येते. शेती, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रात मोतीलाल पाटील यांचे विशेष प्रेम असल्याने त्यांनी यात क्रांती केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्याचे आर्थिक उत्पन्न वाढले पाहिजे व समृद्धीसाठी शेतकऱ्याच्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून परिसरात उच्च शिक्षणाची सोय करून दिली आहे, असे सांगितले. आमदार अनिल पाटील म्हणाले की, मोतीलाल पाटील यांच्या यशात त्यांच्या सौभाग्यवती विमलताईंचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजकीय, सामाजिक, सहकार व शेती क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून एक आदर्श नेतृत्व म्हणून आपला ठसा उमटविला आहे. त्यांचे पुत्र अभिषेक पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून या भागात राष्ट्रवादीची सत्ता आणावी असे सांगत अमळनेरमधील माझ्या विजयाचे श्रेय शहादेकर नागरिकांचे आहे म्हणून मी येथे आभार मानायला आलो आहे, असे सांगितले.
माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील म्हणाले की, आज जगाचा पोशिंदा शेतकरी आंदोलन करीत आहे. आगामी काही काळात आपणा सर्वांना शिक्षणासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. केवळ परीक्षा पास होणे म्हणजे घडणे नव्हे तर त्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपला पाल्य इंग्रजी माध्यमातून शिकावा यासाठी प्रत्येक पालकाची धडपड सुरू असते, यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी असते. मात्र यामुळे मोठे नुकसान होत आहे. मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मांडण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासह त्यांना सक्षम करण्यासोबत विशेष कृती आराखडा राबवण्याची गरज आहे. मोतीलाल पाटील यांनी शिक्षण व शेती क्षेत्रात क्रांतीकारी योगदान दिले आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची सोय परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनीही मनोगत व्यक्त करून मोतीलाल पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. विविध संस्था, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रीती पाटील यांच्यासह गंगोत्री फाउंडेशन, शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कन्येने मांडला मोतीलाल पाटलांचा जीवनपट
मोतीलाल पाटील यांची कन्या अनिता पाटील (पुणे) यांनी मनोगतातून पाटील यांचा ७५ वर्षातील जीवनपट मांडला. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष, केलेला त्याग, अनेकांनी टीका करून साथ सोडली तरी न डगमगता मिळविलेले यश याचा ओघवता आढावा मांडत वडील म्हणून तात्यांनी केलेले कार्य, तपश्चर्या व त्यांचा लाभलेला सहवास सांगितला. संघर्षाच्या बळावर व आत्मविश्वासाच्या ताकदीवर आज सर्वच क्षेत्रात त्यांनी यश संपादन केले असून अशा सत्त्वशील व कर्तृत्ववान पित्याच्या आम्ही कन्या आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगितले.
क्षणचित्रे
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ७५ दिव्यांनी तात्यांचे औक्षण
रक्तदान शिबिरप्रसंगी दात्यांचे रक्तदान
पर्यावरण संवर्धनासाठी ११ हजार १७५ सिड बाॅलचे वाटप, १२ टीमच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी व डोंगराळ भागात टाकण्यात येणार
७५ वर्षाच्या वाटचालीनिमित्त ‘अमृतपर्व’ स्मरणिकेचे प्रकाशन
नंदुरबार जिल्हा दूध उत्पादक कंपनीची स्थापना, पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश असून १ मेपासून दूध संकलन करण्यास प्रारंभ
मोतीलाल पाटील यांची त्यांच्या वजनाएवढी शैक्षणिक साहित्य व पुस्तक तुला करण्यात आली यातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
१९५२ साली शाळेचे प्रथम नोंदणी झालेले विद्यार्थी तुकाराम दगडू पाटील यांचा सत्कार