लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील वडकळंबी व भामरमाळ येथे वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे चार लाख रुपये किमतीचे लाकुड व यंत्र असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या सुत्रांनुसार 14 रोजी नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना मौजे वडकळंबी व भामरमाळ येथील शेतांमधे अवैध तोडीचे मौल्यवान लाकुड व फर्निचर बनविण्याचे यंत्र असल्याची गुप्त बातमी मिळाली. माहितीनुसार दोन पथक तयार करुन नवापूर वनक्षेत्रातील मौजे वडकळंबी येथील शेगा रेशमा गावीत व भामरमाळ येथील यशंवत गोमा गावीत या दोघांच्या घरांची झडती घेण्यात आली. कार्यवाही दरम्यान दोन्ही ठिकाणी रंधा मशिन व ताज्या तोडीचे साग, सिसम व आड जात चौपाट, तयार दरवाजाचे तीन शटर व बॉक्स पलंग आदी मुद्देमाल व यंत्र सामुग्री आढळुन आली. लाकुड व यंत्र जप्त करुन खाजगी व शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय काष्ट आगारात जमा करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे चार लाख रुपये आहे. ही कार्यवाही नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी. के. जाधव, वनरक्षक कमलेश वसावे, नितिन पाटील, दिपक पाटील, सतिष पदमोर, संजय बडगुजर, संतोष गायकवाड, रामदास पावरा, अशोक पावरा, लक्ष्मण पवार, दिपाली पाटील, संगिता खैरनार, आरती नगराळे, वाहन चालक भगवान साळवे, एस.एस तुंगार, आबा न्याहळदे, माजी सैनिक विशाल शिरसाठ, रविंद्र कासे यांनी केली. या गुन्ह्याची प्रादेशिक वनक्षेत्रपाल नवापूर यांनी नोंद घेउन दोन संशयित आरोपींविरुध्द वन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
लाकूडसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:23 IST