तळोदा पंचायत समिती सभापती पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:47 PM2020-01-15T13:47:43+5:302020-01-15T13:47:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय ...

Formula for two-and-a-half year formula for the post of Chairman of Taloda Panchayat Samiti | तळोदा पंचायत समिती सभापती पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला

तळोदा पंचायत समिती सभापती पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. सद्या १० सदस्यीय पंचायत समितीत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल असल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असली तरी पहिल्या चान्स वरून ती फोल ठरल्याचे बोलले जाते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर सभापती, उपसभापतींचे भवितव्य ठरणार आहे.
तळोदा पंचायत समितीवर आतापावेतो काँग्रेस पक्षाने सत्ता काबीज केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या निवणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या तीन गटांसह पंचायत समितीच्या १० पैकी पाच जागा काँग्रेसकडून हस्तगत केल्या आहेत. त्यामुळे १० सदस्यीय पंचायत समितीत या दोन्ही पक्षांचे सारखेच बलाबल झाल्यामुळे पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंचायत समितीतील रंगणाऱ्या अशा सत्ता संघर्षाकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यातच सभापती व उपसभापतींच्या निवडणूक येत्या १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षाच्या सभापतींचे आरक्षणदेखील जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले आहे. आरक्षणानुसार सभापतीपद हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे. म्हणजे सभापतीपदासाठी आदिवासी पुरूष व महिला या दोघ सदस्यांना समान संधी आहे. काँग्रेसकडे चार महिला सदस्या निवडून आल्या आहेत तर भाजपाकडे एकच महिला सदस्या निवडून आली आहे.
पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भाजपा व काँग्रेसच्या दोन्ही स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेच्या अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु दोघा नेत्यांनी पहिल्यांदा अडीच वर्षाच्या सभापतींचा दावा केल्यामुळे ही चर्चा मध्येच फिसकटल्याचीही चर्चा आहे. त्यातच दोघा पक्षांनी आपापले सदस्य बाहेर गावी सहलीकरीता पाठविल्यामुळे फोडा-फोडीचा संवाददेखील थांबला असल्याचे बोलले जात आहे. सभापती-उपसभापतींची अधिकृत निवडणूक घेतली जाणार असली तरी समसमान संख्येमुळे या पदाधिकाऱ्यांचे भवितव्य ईश्वर चिठ्ठीमुळेच शेवटी ठरणार आहे. साहजिकच कोणत्या सदस्यांना ईश्वर पावन होतो. याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Formula for two-and-a-half year formula for the post of Chairman of Taloda Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.