जयनगर : शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे येथून शहादाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्याचा भराव खचला असून, येथे मोठा फरशी पूल बनविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील जयनगर, लोंढरे, कहाटूळ, सोनवदहून मामाचे मोहिदे मार्गे प्रवाशी शहादा येथे जातात. मंगळवारी संध्याकाळी तसेच रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे फरशीवरून पाणी वाहत असल्यामुळे मामाचे मोहिदा येथील हायस्कूल शेजारी असलेल्या रस्त्याचा भराव वाहून गेल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दरवर्षी या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असते. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी या फरशी वरून पाणी वाहत असते. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्यावरून पाणी वाहत होते. नाल्याला आलेल्या पुराच्या जोरदार प्रवाहामुळे येथील रस्त्याचा भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे मामाचे मोहिदे मार्गे शहादा जाणारे जयनगर, धांद्रे, लोंढरे, कहाटूळ, सोनवद मार्गावरील वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहादा - जयनगर ही बसफेरी बंद असल्यामुळे या मार्गावर दुचाकी व तीनचाकी तसेच अवैध चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच या रस्त्यावरून शहादा, लोणखेडा येथे जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहनांची संख्याही अधिक असल्यामुळे खचलेला भराव व्यवस्थित करून रस्ता लवकर दुरूस्ती करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा याठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी या रस्त्यावरील फरशी पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहत असते. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. दरम्यान वाहनधारकांनी भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता याठिकाणी नव्याने फरशी पूल उभारण्याची मागणी केली आहे.