लहान शहादे : नंदुरबार ते शहादाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रकाशा येथील तापी पुलावर उसाने भरलेला ट्राॅला उलटल्याने या ठिकाणी पाच तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. यामुळे लांब पल्ल्याच्या बसेससह शेकडो वाहने अडकून पडली होती.
दरम्यान, या अपघातामुळे प्रकाशा पेट्रोलपंप ते सावळदा व कोरीट फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने शहादा, तळोदा व गुजरात राज्यातील निझर, यावल व सावळदाकडून शहादा व नंदुरबारकडे ये-जा करणारी शहादा-वापी, शहादा-सुरत बससह अनेक वाहने यात अकडून पडली होती. या वेळी उलटलेला उसाचा ट्राॅला बाजूला करण्यासाठी आयान कारखान्याचे कर्मचारी दाखल झाले होते. या कर्मचाऱ्यांनी ऊस व ट्राॅला बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
या वेळी कोरीट फाट्यापर्यंत नंदुरबार तालुक्याची हद्द असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी अपेक्षाही नागरिक व वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.