नंदुरबार : पाचवी ते आठवीच्या वर्गाचा पहिला आठवडा हा जेमतेमच गेला. अवघी १५ टक्केच्या आतच उपस्थिती राहिली. या आठवड्यात विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेतर्फे पालकांना आवाहन करण्यात येत आहे. या आठवड्यात किमान ३५ ते ४० टक्के उपस्थिती राहावी, असे नियोजन शिक्षण विभागाचे देखील आहे. दरम्यान, पालकांकडून संमतीपत्र भरून घेतले जात आहे. दुसरीकडे पालकांना विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय साहित्य खरेदीसाठीचा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
बुधवार, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरुवात झाली. आधी अर्थात २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यातील उपस्थिती देखील ४० टक्केच्या वर पोहचू शकली नाही. त्यातच आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गांमध्ये विद्यार्थी उपस्थिती कशी आणि किती राहते याबाबत उत्सुकता आहे.
पहिल्या दिवशी दहा टक्के उपस्थिती
शाळेच्या पहिल्या दिवशी अर्थात २७ जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थी उपस्थिती अवघी दहा टक्के होती. ती चार दिवसात दोन ते तीन टक्केच वाढली आहे. त्यामुळे १५ टक्केच्या वर उपस्थिती जाऊ शकली नाही. त्याला विविध कारणे असली तरी पालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अजूनही प्रयत्नांची गरज असल्याचे चित्र आहे.
पालकांमध्ये भीती कायम
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकांमध्ये अद्यापही भीती आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवत नसल्याचे चित्र आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची गर्दी, मुलांना नियमांबाबत फारसे गांभीर्य नसणे, कुठल्याही वस्तूला हात लावणे, एकत्र खेळणे आदी प्रकार मुलांकडून होतात. त्यामुळे मुुलांना प्रादुर्भावाची मोठी भीती असते. त्यासाठीच पालक त्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे.
शाळांनी केली उपाययोजना
शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या सर्व आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील उपाययोजनांबाबत दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक शाळेने प्रवेश द्वारावरच थर्मल गन, ॲाक्सिमीटर याद्वारे तपासणी करण्याचे नियोजन केलेेले आहे. प्रत्येकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सक्ती केली जाते. शिवाय विद्यार्थ्यांना शक्य असल्यास त्यांनी सोबत सॅनिटायझर सोबत आणण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय मास्कदेखील सक्तीचा करण्यात आला आहे. वर्गात देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा प्रयत्न शाळांकडून केला जात आहे.
पालकांमध्ये संभ्रमावस्था...
n विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची उत्सुकता असली तरी पालकांची नकार घंटा आणि शाळेत नेण्यासाठी व आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसणे यामुळे देखील उपस्थिती वाढत नसल्याची स्थिती आहे. याबाबत प्रशासनाने आणि शाळांनी पालकांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक आहे.
सलग पाच तासिका...
n ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या शाळांनी एक दिवआड वर्ग भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. शिवाय सलग पाच तासिका केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना मधली सुट्टी राहत नाही. शिवाय पोषण आहारदेखील दिला जात नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य यातून दिले जात आहे.
तालुकानिहाय पाचवी ते आठवीच्या शाळा...
n नंदुरबार तालुक्यात १३३ शाळा असून पहिल्या दिवशी सर्वच शाळा सुरू झाल्या.
n नवापूर तालुक्यात ५० शाळा असून सर्वच सुरू झाल्या.
n शहादा तालुक्यात ११० शाळा असून पहिल्या दिवशी १०१ शाळा सुरू झाल्या.
n तळोदा तालुक्यात ३३ शाळा असून पहिल्या दिवशी ३१ शाळा सुरू झाल्या.
n अक्कलकुवा तालुक्यात ३१ पैकी सर्वच शाळा सुरू झाल्या.
n धडगाव तालुक्यात १३ शाळा असून सर्वच सुरू झाल्या.