कोरोना संक्रमणाला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढलेल्या आदेशानुसार १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना काहीवेळ सूट देत इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील सलून मागील वर्षापासून लॉकडाऊन काळात बंदच आहेत. दररोज होणाऱ्या व्यवसायावरच व्यावसायिकांची उपजीविका अवलंबून असते. दररोज व्यवसाय झाला तरच सलून व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत असतो. मात्र मागील अनेक महिने व्यवसाय बंद असल्याने मोठ्या अडचणींचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी झाले असून, आता परत १५ दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागणार असल्याने अनेक व्यावसायिकांपुढे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक सलून दुकानावर काम करणारे कारागीर पूर्ण उद्ध्वस्त झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक कारागीर शहरातील वेगवेगळ्या सलून दुकानांवर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कारागिरांना रोजगार नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून, काम मिळाले तर घरोघरी जाऊन दाढी-कटिंग करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कुटुंबाचा गाडा कसा ओढावा
गेल्यावर्षीही अनेक महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे अनेकांनी कायमचेच व्यवसाय बंद केले आहेत. आता पुन्हा व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने कुटुंबाचा गाडा कसा ओढावा, असा प्रश्न व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे. शहरात सलूनची एकूण ७० दुकाने असून, या कुटुंबांना उपजीविका कशी भागवावी, असा प्रश्न सतावत आहे.
जिल्हा प्रशासनाने सलून व्यवसायदेखील अत्यावश्यक सेवेत मोजला पाहिजे. दुकानावर येणारे ग्राहकदेखील मोठी काळजी घेतात. तसेच आम्हीही ग्राहकांची काळजी घेत असतो. त्यामुळे प्रशासनाने काही वेळ सूट देण्याची गरज आहे.
-अविनाश न्हावी, सलून व्यावसायिक, शहादा
इतर व्यवसायांना शासनाने परवानगी दिली. परंतु यात पूर्णपणे नाभिक व्यवसाय, सलून व्यवसाय, जेन्ट्स पार्लर व लेडीज पार्लर यांना मात्र बंदी केली आहे. मात्र हातावर पोट भरणाऱ्या सलून कारागिरांना दुसऱ्या कोणत्याही उत्पन्नाची साधने नसल्याने त्यांना व कुटुंबाला उपासमार सहन करावी लागत आहे. त्यातच घरभाडे, दुकानाचे भाडे, वीजबिल, बँकेचे कर्ज, आरोग्याचा खर्च व पोट कसे भरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
-प्रा.अनिल साळुंके, सल्लागार, नाभिक हितवर्तक व दुकानदार संघटना, शहादा
प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमांचे पालन करून आम्ही आमचे व्यवसाय सुरू ठेवले होते. त्यामुळे काही काळ आमचा उदरनिर्वाहही चांगल्याप्रकारे होत होता. मात्र पुन्हा बंद असल्याने आता नेमकं काय करावं तेच कळत नाही.
-खुशाल न्हावी, पदाधिकारी, नाभिक दुकानदार संघटना, शहादा
सद्य:स्थितीत नाभिक समाजाची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक समाज बांधव भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन कामधंदा करून पोटाची खळगी भरत आहेत. मात्र आता भाडेही देऊ शकत नाहीत.
-अजय पवार, अध्यक्ष, नाभिक दुकानदार संघटना, शहादा