पालकांमध्ये धाकधूक व भिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:24 PM2021-01-18T12:24:19+5:302021-01-18T12:24:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्र्यांची २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिल्याने शालेय शिक्षण विभागाने ...

Fear and anxiety persist among parents | पालकांमध्ये धाकधूक व भिती कायम

पालकांमध्ये धाकधूक व भिती कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्र्यांची २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिल्याने शालेय शिक्षण विभागाने आवश्यक त्या तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या दररोज २५ पेक्षा अधीक येत आहे. असे असतांना शाळा सुरू करतांना मुलांची काळजी घेतली जाईल किंवा कसे याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू कराव्या असा मतप्रवाह पालकांमध्ये असल्याचे चित्र आहे. 
              नववी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. खान्देशात २३ नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरू करणारा नंदुरबार एकमेव जिल्हा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या शाळांमुळे पालकांमध्ये भिती व धाकधूक होती. परंतु आतापर्यंत या वर्गाच्या एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली नाही. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. त्यामुळेच आता पाचवी ते आठवीच्या वर्गातील पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 
            आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जाण्यात जमा आहे. खालच्या वर्गाचा अभ्यासक्रम समजला नाही तर पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम कसा समजणार? त्यामुळे पालकांनीच शाळा सुरू करण्याचा काही ठिकाणी आग्रह धरला आहे. दुसरीकडे काही खाजगी शिकवणीचालकांनी शिकवण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालक अशा ठिकाणी पाल्यांना पाठवत आहेत. 
उपाययोजना कराव्या
             शाळांनी वर्ग सुरू करतांना आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभाग तशा सुचना करणारच आहे. आधीच शाळांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्या ज्या ठिकाणी जास्त हात लावतात अशा ठिकाणी दर काही तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरणार आहे. स्वच्छतागृहाबाबतही दक्ष राहावे लागणार आहे. शाळेत मिळणारा आहार देतांना, विद्यार्थी तो खातांना आवश्यक त्या सुचना आणि दक्षता बाळगावी लागणार आहे. 
          सर्वात मोठी समस्या ही शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची राहणार आहे. अवघ्या दहा दिवसात शिक्षकांची कोविड चाचणी होईल का? हा प्रश्न आहे. त्यादृष्टीनेही जिल्हा प्रशासनाला नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. दुसरी समस्या ही शाळेतील विद्यार्थी संख्येची राहणार आहे. काही मोठ्या शाळांमध्ये एकाच वर्गात किमान ५० ते ८० विद्यार्थी असतात. अशा विद्यार्थ्यांना बसवितांना कसे बसविणार. एका बाकावर एक विद्यार्थी शक्य नाहीच. अशा वेळी शाळांची मोठी कसरत राहणार आहे. त्याबाबतही अद्याप स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या नाहीत. 
          २७ जानेवारी ही तारीख ठरली असली तरी दहा दिवसात आवश्यक त्या तयारीला वेग द्यावे लागणार आहे. सोमवारी शिक्षण विभागातर्फे शाळांना काय आदेश दिले जातात? त्यानुसार शाळा काय कार्यवाही करतात यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे मार्गदर्शक नियमावलीची प्रतिक्षा आहे.

शिक्षण विभागाला अद्याप आदेश नाहीत 
 पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला अद्याप आदेश मिळालेले नाहीत. सोमवारी ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तयारीला सुरुवात होईल. २७ जानेवारी ही तारीख असल्यामुळे दहा दिवसात तयारीला वेग द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

  इयत्ता पाचवी  २७९५३                                                                                                                                                                       इयत्ता सहावी २५३२८                                                                                                                                                                          इयत्ता सातवी  २४७०६                                                                                                                                                                          इयत्ता आठवी  २४५४०                                                                                                                                                                                       जिल्ह्यातील एकुण शाळा  २६१                                                                                                                                                           शहरी भागातील शाळा  ४२%

पालकांना काय वाटते

शासनाने शाळा सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी अद्याप मार्गदर्शक नियमावली जारी केलेली नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याबाबत संभ्रम आहे. शासनाने आश्वासीत केले तर नक्कीच माझा मुलगा शाळेत पाठवू
         -सुदामसिंग जाधव, पालक,नंदुरबार

विद्यार्थ्यांचे असेही नुकसान झालेच आहे. आता किमान दोन ते तीन महिने तरी शाळा सुरू करून त्यांचा पाया पक्का करावा. आताचा अभ्यासक्रम समजला नाही तर पुढील सर्व इयत्तांच्या अभ्यासक्रम समजण्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने शाळा सुरू कराव्या व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी अपेक्षा आहे.
                       -संजीवनी पाटील, पालक,शहादा.

शाळा सुरू करतांना संस्थांनी आवश्यक त्या सर्व काळजी घेऊनच त्या सुरू कराव्या. लहान मुलांची आकलन क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांना सर्व त्या बाबींची माहिती देऊन आधी जागृती करावी. पालकांनी देखील घरीच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना द्याव्या. 
                            -सुभाष पावरा,पालक,नवापूर.

  

Web Title: Fear and anxiety persist among parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.