लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलगा व सून सांभाळ करीत नाही. वृद्धपकाळात काळजी घेत नाही. त्यामुळे आपला छळ होत असून आपल्या जिवाला व मालमत्तेला धोका असल्याची फिर्याद बापाने मुलाविरुद्ध दिली. शहर पोलिसात नव्या अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ नथ्थू साळी, रा.गांधीनगर, नंदुरबार असे वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुलगा सुनील साळी व त्यांची प}ी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ साळी हे 89 वर्ष वयाचे आहेत. त्यांचे स्वमालकीचे घर गांधीनगरमध्ये आहे. घरात मुलगा व सून हे निळकंठ साळी यांना नेहमीच त्रास देतात. भोजन, निवारा, देखभाल, औषधोपचार करीत नाही. निर्वाहाबाबत कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. नेहमीच अंगावर धावून जाणे आणि शिविगाळ करणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे आपल्या जिवीतास व मालमत्तेला देखील धोका असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था यांच्यामार्फत त्यांनी फिर्याद दिली. त्यावरून मुलगा व सून यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वळवी करीत आहे.
मुलगा सांभाळ करीत नसल्याने बापाची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:58 IST