नंदुरबार : पाणी टंचाई आणि जलयुक्त कामांमधील शिल्लक निधीतील कामे यावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात आली. पाणी टंचाई निवारणार्थ आणि त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्या यासाठी तालुका स्तरावर बैठका घेण्याचे नियोजन करण्याच्या सुचना अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिल्या. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सभागृहात झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, विषय समिती सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, हिराबाई पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पाणी टंचाईचे गांभिर्य आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली. अध्यक्षा रजनी नाईक यांनी संभाव्य किती गावांना पाणी टंचाई जाणवू शकेल याबाबत विचारणा केली. परंतु टंचाई निवारण आराखडा तयार झालेला नसल्यामुळे तसे ठोस सांगता येणार नाही. नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यात टंचाईची तीव्रता अधीक राहण्याची शक्यता लक्षात घेवून उपाययोजना करण्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे लवकरच तालुकास्तरावर बैठका आयोजित करून पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात यावी. जेणेकरून स्थानिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेता येतील असे त्यांनी सांगितले.सदस्य रतन पाडवी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला. कमी अनुभव असलेल्यांची भरती झाली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिकविण्याचा अनुभव असणा:यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे यांनी निवड समिती ही जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यांना भरतीचे अधिकार होते. त्यांच्याकडून निवड यादी आलेली आहे. अद्याप कुणालाही नियुक्तीपत्र दिले गेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाणीटंचाई समस्येवर तालुकानिहाय बैठकांवर देणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:57 IST