तोरणमाळ पठाराच्या 300 मिटर अंतरावावरच मजुरांवर काळाचा घाला, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मारल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:49 PM2021-01-24T12:49:07+5:302021-01-24T12:49:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/ब्राम्हणपुरी : खडकी गावाचा तीव्र चढाव चढून अवघ्या ३०० ते ४०० मिटरवर असलेल्या तोरणमाळ पठाराच्या अलीकडे ...

At a distance of 300 meters from the Toranmal Plateau, many workers jumped to save their lives. | तोरणमाळ पठाराच्या 300 मिटर अंतरावावरच मजुरांवर काळाचा घाला, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मारल्या उड्या

तोरणमाळ पठाराच्या 300 मिटर अंतरावावरच मजुरांवर काळाचा घाला, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी मारल्या उड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/ब्राम्हणपुरी : खडकी गावाचा तीव्र चढाव चढून अवघ्या ३०० ते ४०० मिटरवर असलेल्या तोरणमाळ पठाराच्या अलीकडे वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने वाहन उतारावर घसरू लागले. काहींनी वाहनातून उड्या मारल्या, परंतु आत बसलेल्यांना ती संधी न मिळाल्याने वाहन खोल दरीत कोसळून सहाजणांना आपला जीव गमावाव लागला. तर १८ जणांना जायबंदी व्हावे लागले. ५०० फूट खोल दरीत जखमी विव्हळत पडल्याने व मदतीसाठी आर्त हाक मारत असल्याने दरीचा परिसरात हाकाकार उडाला होता. 
हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये ३० प्रवासी बसले. प्रवास सुरू झाल्यानंतर तोरणमाळ-खडकी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर जीप आली असता तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जीप सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात सहा प्रवासी जागीच मृत झाले असून अनेक गंभीर झाले आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेली ही जीप दरीत कोसळण्यापूर्वी अनेकांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.
तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंंतरावरील घाटरस्त्यात तीव्र चढाव आहे. एका वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत प्रचंड वेगाने पडली. या अपघातात जीपगाडीचे पूर्ण नुकसान झाले असून चारही बाजूने गाडी पूर्णपणे   उलटल्याने फुटली आहे. जीपचे इंजिन, दरवाजे व इतर स्पेअर पार्ट अस्ताव्यस्तपणे आजूबाजूला पडले होते. अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की, संपूर्ण दरीतून जखमी प्रवाशांच्या किंकाळ्या, आरडाओरड व रडारडीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
खडकी गावातून सकाळी सात वाजता निघाल्यानंतर खडकी पॉइंटजवळ अवघ्या काही मिनिटात हे सर्व प्रवासी पोहोचणार होते. खडकी पॉइंट येथून तोरणमाळपर्यंत    सपाटीचा रस्ता आहे. मात्र त्यापूर्वीच जीप घाटात कोसळली व काळाने या सर्वांवर घाला घातला. 
अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी खडकी पॉइंट ते तोरणमाळ असे सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी पळत जाऊन तोरणमाळ गावात पोहोचल्यानंतर तेथील नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर तोरणमाळचे माजी सरपंच पहाडसिंग नाईक, जयसिंग चौधरी, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी,  सायसिंग रावताळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
अतिशय खोल दरी असल्याने येथील जखमी व मृत प्रवाशांना दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. कुठलीही साधन सुविधा नसताना तोरणमाळच्या ग्रामस्थांनी वनविभाग, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळेल ते साधन साहित्याचा वापर करून जखमींना दरीतून बाहेर काढले व मृत प्रवाशांचे पार्थिव बाहेर  काढले. त्यानंतर आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात     आले. 

Web Title: At a distance of 300 meters from the Toranmal Plateau, many workers jumped to save their lives.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.