उनपदेव पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:00 PM2020-07-14T22:00:57+5:302020-07-14T22:01:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित ...

Dissatisfied with the neglect of Unapdev tourist spot | उनपदेव पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षामुळे नाराजी

उनपदेव पर्यटनस्थळाकडे दुर्लक्षामुळे नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सातपुडा पर्वत रांगेत, दरा धरणाशेजारी निसर्गरम्य वातावरणातील व पर्यटकांचे आकर्षणाचे मुख्य केंद्र असलेले निसर्गनिर्मित गरम पाण्याचा झरा म्हणून प्रसिद्ध असलेले उनपदेव ता.शहादा या धार्मिक व पर्यटनस्थळाची दुरवस्था झाली असून पालकमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांसह पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून औषधी गुणधर्म असलेल्या व नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेल्या उनपदेव, ता.शहादा या पर्यटनस्थळाची दुरवस्था झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे . श्रावण महिन्यात अनेक भाविक येथे येतात. धार्मिक उपक्रम राबवितात तर येथील गरम पाण्यात गंधकाचा समावेश असल्याने व हे पाणी नैसर्गिकरितीने भूगर्भातून गरम स्वरूपात येत असल्याने या पाण्यामुळे अनेक दुुुर्धर चर्मरोग बरे झाले असल्याने सर्वांचेच आकर्षण असलेल्या या पर्यटनस्थळी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने येथे येणाºया महिला भाविक व पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
२००६ व २०१७ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकी नदीला महापूर आला. या महापुरात उनपदेव संपूर्ण उद्ध्वस्त झाले. पर्यटकांच्या सोयीसाठी असलेल्या येथील मूलभूत सुविधा नेस्तानाबूत झाल्या. गरम पाण्यावरील गोमुख, स्वच्छतागृह, पर्यटकांसाठी कपडे बदलण्यासाठी असलेले प्रसाधन गृह, नदी ओलांडून जाण्यासाठी निर्माण करण्यात आलेले साकव, रस्ते व विविध विकास कामे उद्ध्वस्त झाली होती. अगदी गरम पाण्याचा झरासुध्दा नष्ट झाला होता. महापुराच्या काही कालावधीनंतर स्थानिक ग्रामस्थ व हौशी पर्यटकांनी या भागात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली व गरम पाण्याचा झरा शोधला. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने तात्पुती उपाययोजना करुन गरम पाण्याचा प्रवाह जीवंत ठेवण्यात यश मिळविले होते.
मात्र यानंतर जिल्हा परिषद, वनविभाग व स्थानिक प्रशासनाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी येथे येणाºया पर्यटकांना कुठलीही मुलभूत सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे. मध्यंतरीच्या काळात राणीपूर, ता.शहादा वनविभागामार्फत येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या अर्धाकृती पुतळ्यासह विविध वनौषधींची बाग निर्माण करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी पॅगोडाची निर्मिती करण्यात आली तर बालकांसाठी बागेतच विविध खेळणी ठेवण्यात आली होती त्याचीही आता दुरवस्था झाली आहे. संरक्षणासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या खांबाचे तारेचे कुंपणही तुटून गेले आहेत. तर वनविभागाने निर्माण केलेला दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता हा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा अवस्थेत आहे. तीव्र चढ-उतार असल्याने या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना पर्यटक व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या सर्व सुविधांचीही पुनर्निमिती करणे आवश्यक आहे.
पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या धार्मिक, निसर्गरम्य व आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या पर्यटनस्थळाकडे विशेष बाब म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यटन खात्यामार्फत येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आंघोळीसाठी व्यवस्था, प्रसाधन गृह, विश्रांती कक्ष, रस्ता, उद्यानाची निर्मिती व नदी ओलांडून जाण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे .

Web Title: Dissatisfied with the neglect of Unapdev tourist spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.