वादग्रस्त विषयांमुळे सभा तहकूब झाल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:44 PM2020-05-30T12:44:18+5:302020-05-30T12:44:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अपरिहार्य कारणामुळे तळोदा नगरपालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले ...

Discussion that the meeting was adjourned due to controversial issues | वादग्रस्त विषयांमुळे सभा तहकूब झाल्याची चर्चा

वादग्रस्त विषयांमुळे सभा तहकूब झाल्याची चर्चा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अपरिहार्य कारणामुळे तळोदा नगरपालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले तरी विषय पत्रिकेवरील काही वादग्रस्त विषयांवरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत होते. त्यामुळे सभा तहकूब करावी लागल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.
तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी १० वाजेला पालिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पालिकेने सभागृहात होणारी सभा प्रांगणात आयोजित केली होती. त्यासाठी मंडप टाकून अंतर राखत व्हीलचेअरर्सदेखील लावल्या होत्या. सभेतील अजेंड्यावर तब्बल ५४ विषय घेण्यात आले होते. यात पालिकेच्या मोकळ्या जागांवर बगीचा विकसीत करणे, चौक सुशोभिकरण करणे, काही ठिकाणी रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण करणे, पालिकेच्या गाळ्यांचे अधिमूल्य निश्चित करणे, पालिका हद्दीतील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, नोटा मोजणी मशीन खरेदी करणे, नवीन प्रशासकीय इमारतीत पाईप लाईन, कुपनलिका करणे, त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून सुरक्षा उपकरणे व अनुषंगीक साहित्य खरेदी करणे या विषयांव्यतिरिक्त देवेंद्र हिरालाल बागुल यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर बियर बारला ना हरकत दाखला देणे, जितेंद्र दुबे यांच्या घरासमोरील अस्तित्वात असलेली मुतारी इतरत्र हलवून शहराजवळील बायोडिझेल पंपास एनओसी देणे अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होता. तथापि, शुक्रवारी सकाळी १० वाजेला सुरू होणारी सभा तब्बल पावणे अकरा वाजेपावेतो सुरु झाली नाही. शेवटी सभेचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी काही अपरिहार्य कारणामुळे सभा तहकूब केली. परंतु सभेसाठी एवढी सुसज्ज तयारी करण्यात आल्यानंतर तळोदेकरांमध्ये सभेबाबत कुतूहल होते. सभेतील तीन विषयांवर सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांमध्येच आपसात मोठे मतभेद होते. आपसातील हे वाद जगजाहीर होऊ नये म्हणून सभा तहकूब करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांना घ्यावी लागल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात होती.


बियरबारच्या परवानास ना हरकत देण्याबरोबरच शहराजवळील नवीन बायोडिझेल पंपासही नाहरकत देणे शिवाय खान्देशी गल्लीच्या तोंड्यावरील शौचालय इतरत्र हलविणे. या प्रमुख तीन विषयांवर सत्ताधारी भाजपा नगरसेवकामध्येच मतभेद होते. काही ठरावाच्या बाजूने तर काहीचा विरोध होता. त्यामुळे या वादग्रस्त विषयांवर सभा गाजणार होती. याबाबत आदल्या दिवशी एका गटाकडून रणनितीही आखण्यात आली होती. ही बाब प्रत्यक्ष आमदार राजेश पाडवी यांच्या कानावर आल्यामुळे त्यांनी तडक सत्ताधारी नगरसेवकांमध्ये संवाद साधला. नगरसेवकांनी त्यांच्यापुढेदेखील आपसातील रूसवे-फुगवे कथन केले. या पदाधिकाऱ्यांची समजूत काढल्यानंतर शेवटी नगराध्यक्षांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पालिकेची सभा शुक्रवारी सकाळी १० वाजेला आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे विरोधी काँग्रेसचे सर्वच नगरसेवक सभास्थळी हजर झाले होते. मात्र भाजपाचे एकही नगरसेवक सभास्थळी फिरकला नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगली तयारी केली असल्यामुळे सर्व तयारीनिशी आले होते. १० वाजेची सभा तब्बल १०.४० लादेखील सुरू होवू शकली नाही म्हणून गटनेते गौरव वाणी यांनी पालिका प्रशासनानस सभा चालू होण्याबाबत विचारले तेव्हा सभा काही अपरिहार्य कारणामुळे तहकूब करण्यात आल्याचे त्यांना प्रशासनाने सांगितले.
शुक्रवारी होणाºया पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी बाहेरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामुळे पालिकेस एखाद्या छावणीचेच स्वरूप आले होते. स्वत: उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी विक्रम कदम तळोद्यात हजर होते. त्यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता जरी बं’ोबस्ताची मागणी पालिकेने केली नव्हती. परंतु पालिकेची सभा वादळी ठरण्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळेच अतिरिक्त बंदोबस्त मागविल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष असतात. सभेबाबत ते निर्णय घेऊ शकतात. शुक्रवारची सर्व साधारण सभा तहकूब करण्याचे पत्र त्यांनीच दिल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली होती.
-सपना वसावा,
मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा
कोरोना महामारीने तालुक्यातही धडक दिली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शुक्रवारची पालिकेची सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात याच विषयांवर सभा घेण्यात येईल.
-अजय परदेशी,
नगराध्यक्ष, नगरपालिका, तळोदा
अजेंड्यावरील दोन-तीन विषय सोडले तर सर्वच विषय विकासाचे होते. वादातील विषय टळू शकले असते. परंतु त्याच्यासाठी सभा तहकूब करणे म्हणजे विकास कामांना खीळ घालणे. काँग्रेस नगरसेवकांनी अडीच वर्षामध्ये विकास कामांना कधीच विरोध केला नाही. सभा तहकूब करणे म्हणजे विकास कामांनाही अडथळा बसतो.
-गौरव वाणी,
गटनेते काँग्रेस, नगरपालिका, तळोदा


 

Web Title: Discussion that the meeting was adjourned due to controversial issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.