‘थर्टी फर्स्ट’ला शिस्तीचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:26 IST2019-12-31T12:26:13+5:302019-12-31T12:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील रस्त्यांवर ३१ डिसेंबरला मद्यपान करुन भरधाव वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर यंदा कठोर कारवाई करण्याचे ...

‘थर्टी फर्स्ट’ला शिस्तीचा आग्रह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील रस्त्यांवर ३१ डिसेंबरला मद्यपान करुन भरधाव वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांवर यंदा कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस दलाने दिले असून जागोजागी पॉर्इंट उभारुन वाहनचालकांची ‘ब्रेथ अॅनलायझर’ने चाचणी करण्याची तयारी करण्यात आली आहे़ वाहतूक शाखेसोबत दारुबंदी विभागानेही पथकांची निर्मिती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे़
जिल्ह्यातील विविध भागात नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येते़ यानिमित्त महामार्ग, राज्यमार्गासह ग्रामीण भागात मद्यपान करुन वाहन चालवणारे सर्रास आढळतात़ यातून गंभीर अपघात होऊन काहींना जीवही गमवावा लागला आहे़ या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून आठ दिवसांपासून जनजागृती करण्यात येत आहे़ ३१ डिसेंबरच्या रात्री दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यासाठी वाहतूक शाखेच्या अद्ययावात वाहनातील ब्रेथ अॅनलायझरद्वारे तपासणी करुन वाहने सोडण्यात येणार आहेत़
वाहनधारकांवर कारवाईची तयारी सुरु असताना जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत अवैध मद्यावर कारवाई करण्यात येत आहे़ यांतर्गत सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने टेंभे ता़ शहादा येथे २ हजार ४०० रुपयांची गावठी दारु नष्ट करुन भाऊसाहेब पानपाटील याच्यावर कारवाई करण्यात आली़
शहादा पोलीसांच्या पथकाने वाघार्डे येथे २ हजार ९०० रुपयांचे गावठी मद्य नष्ट करुन गोटा शिकत्या पावरा याच्यावर कारवाई करत नोटीस बजावली़
नंदुरबार शहर पोलीसांच्या पथकाने भोणे शिवारातील पमण रमण भिल याच्यावर कारवाई करत १ हजार रुपयांची हातभट्टीची दारु जप्त करुन नष्ट केली़
नंदुरबार तालुका पोलीसांनी आसाणे येथे १ हजार रुपयांची गावठी दारु नष्ट करुन युवराज भिल याच्यावर कारवाई केली़ तळोदा पोलीसांनी रोझवा येथे १ हजार ३८० रुपयांचा माल जप्त करत किरता पाडवी याच्यावर कारवाई केली़ विविध भागात सध्या अवैध मद्यावर कारवाई करण्यात येत आहे़
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्रीची दुकाने तसेच बियर बार यांना दुकानांच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे़ ३१ च्या रात्री परवानाधारक दुकानांमध्ये रात्री १ वाजेपर्यंत मद्य विक्री होऊ शकते़ यानंतर मात्र ही दुकाने बंद होणार आहेत़ उत्पादन शुल्क विभागाकडून १ डिसेंबरपासून जिल्ह्यात अवैध मद्य विक्रीवर कारवाई सुरु आहे़ यांतर्गत पथकांची नियुक्ती करुन परवाने आणि स्टॉक तपासणीचे काम सुरु असल्याची माहिती आहे़ ३१ डिसेंबरच्या रात्रीही ही पथके शहरी आणि ग्रामीण भागात भेटी देऊन लक्ष ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़