लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : समर्पण या सेवाभावी व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तू वाटपाचा शुभारंभ जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या सात वर्षापासून ग्रुपतर्फे हा उपक्रम सुरू आहे.या वेळी विष्णू जोंधळे, अनिल भामरे, राजेंद्र गुप्ता, रूपेश जाधव, प्रा.नेत्रदीपक कुवर, सुपडू खेडकर, अजित बाफना, विनोद जैन, प्रा.डॉ.अनिल साळुंके आदी उपस्थित होते. युवकांच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम परिसर व राज्यात आदर्श असून याला व्यापक करण्याच्या संकल्पाला अभिजित पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. समाज माध्यमांच्या आभासी दुनियेत आता माणुसकी स्त्रवते आहे. या आधुनिक युगातही सातपुडय़ाच्या गिरीकंदरातील आदिवासी बांधवांची दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणा:या आणि समर्पित अशा सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचे ‘समर्पणा’ने सात वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या सहा वर्षापूर्वी स्व.महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सौरभ जहागिरदार व प्रशांत पाटील या शिक्षीत व सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी हा विडा उचलला. यातूनच आपले मित्र व समविचारी लोकांच्या माध्यमातून एक एक करत 226 जण एकत्रित आलेत आणि त्यातूनच समर्पण अनेकांची दिवाळी साजरी करतोय. समर्पणच्या माध्यमातून सातपुडय़ाच्या दुर्गम भागात दिवाळीनंतरची दिवाळी सुरू होते. कोणाच्याही व्यक्तीगत नावाशिवाय चाललेला हा उपक्रम आज राज्यात लौकिकास पात्र झाला आहे. या वेळी समर्पणला आकार देणा:या स्व.महेश पाटील यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली.समर्पण ग्रुपतर्फे यंदा 150 किलो चिवडा, 30 किलो सोनपापडी, 800बिस्कीटपुडे, एक हजार 200 कॅडबरी चौकलेट, 350 चप्पल जोड, 175 ब्लँकेटस, 350 मुलांचे ड्रेस, 45 शाली, 255 मोठय़ा मुलांचे ड्रेस, 255 लहान मुलींचे ड्रेस, 35 लहान मुलांचे स्वेटर, 45 कानटोप्या, 65 मोठय़ा माणसांचे ड्रेस, 65 साडय़ा, 250 फरसाण पाकीट आदींचे वाटप तोरणमाळ व जवळच्या पाडय़ांमध्ये करण्यात आले.
‘समर्पण’ने केली सातपुडय़ातील गरीबांची दिवाळी गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:07 IST